कैद्यांनी बनवलेल्या वस्तूंना प्रोत्साहन द्या : डॉ. उपाध्याय

0

पुणे । राज्यभरातील कारागृहांमध्ये बंदिबांधव खूप मेहनतीने अनेक टिकाऊ व माफक दरातील वस्तू स्वत: तयार करतात. कैद्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी व त्यांनी घेतलेल्या कष्टाचे मोल लक्षात घेऊन नागरिकांनी जास्तीत जास्त वस्तूंची खरेदी करावी असे आवाहन कारागृह विभागाचे महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शुक्रवारी केले.

रक्षाबंधन सणानिमित्त महाराष्ट्र राज्य कारागृह विभागाच्या वतीने कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन महानिरीक्षक डॉ.उपाध्याय यांच्या हस्ते झाले. यावेळी कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक विठ्ठल जाधव, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, अधिक्षक यु.टी. पवार, उपअधिक्षक दिलीप वासनिक, कौस्तुभ कुर्लेकर, तुरुंगाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल खटावकर, सहायक पोलिस आयुक्त वसंत तांबे उपस्थित होते.

उपाध्याय म्हणाले, वर्षानुवर्षे कारागृहात बंदी असलेल्या कैदी ठराविक काळापर्यंत कैदी म्हणून कारागृहात राहतात. मात्र येथे त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि कारागृहाच्या बाहेर पडताना कुशल कारागीर म्हणून ते बाहेर पडतात. कारागृहातील विक्री केंद्राच्या माध्यमातून 1989पासून नागरिकांना विक्रीसाठी उपलब्ध केली जात असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे अधिक्षक यु.टी. पवार यांनी सांगितले.

राज्यभरातील कारागृहातील अधिकारी व कर्मचारी आपली जबाबदारी चांगली पार पाडतात. मात्र रिवॉर्ड अथवा बक्षिसासाठी बरीच कमी नावे पुढे येत असतात. कारागृहातील बंद्यांकडून कलात्मक आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेणे ही बाब कौतुकास्पद असून, चांगल्या अधिकारी व कर्मचार्‍यांचे रिवॉर्ड पाठवण्याची सूचना महानिरीक्षक डॉ.उपाध्याय यांनी यावेळी केली. या प्रदर्शनात सागवाणी फर्निचर, खादीचे कपडे, पेन्टिंग, चपला, बेल्ट, बांगडी ठेवायचे रॅक, छोट्या शेगड्या, शोभेच्या वस्तू, लेदरचे पाकीट आदी वस्तू स्वस्त दरात नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.