कैद्याचे मद्यप्राशन तिघा पोलिसांना भोवणार ?

0

कारागृहातून पळून जाण्याचा केला होता प्रयत्न ः वैद्यकीय तपासणीत झाले निष्पन्न

जळगाव – न्यायालयीन कामकाजानंतर पुन्हा कारागृहात सोडतेवेळी राकेश वसंत चव्हाण वय 28 रा. धार रोड अमळनेर, याने कर्मचार्‍याच्या हाताला हिसका देवून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पाठलाग करुन कर्मचार्‍यांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले होते. वैद्यकीय तपासणीत संशयित चव्हाण याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले असून तो दारु कशी पिला, त्याला कोणी पाजली याप्रकारे चौकशी करण्यात येत असून यात गार्ड तिघा पोलीस कर्मचारी दोषी असल्याचे सिध्द झाल्यास तिघांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दिली आहे.

काय घडली होती घटना

अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल राकेश चव्हाण विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो कारागृहात आहे. गुरुवारी न्यायालयीन कामकाज असल्याने त्याला अमळनेर येथे न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला सकाळी 10 वाजेच्या सुमारास मुख्यालयातील गार्ड प्रकाश कोकणी, सुभाष राठोड, संजय गोसावी या तिघांनी ताबा घेतला. व अमळनेर न्यायालयात तारखेवर हजर करुन पुन्हा सायंकाळी 7 वाजता कारागृहात आणले. याठिकाणी कारागृहाच्या प्रवेशव्दारावर कर्मचार्‍याच्या हाताला हिसका देवून पळाला. काही अंतरावर तिघा कर्मचार्‍यांनी त्याचा पाठलाग करुन पकडले. व पुन्हा कारागृह प्रशासनाच्या ताब्यात दिले.

संशयित दारु पिला की त्याला कुणी पाजली?

कारागृहात गोंधळ घालणार्‍या राकेश चव्हाण हा मद्याच्या नशेत असल्याने मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास संशयित राकेश सह पोलीस कर्मचारी प्रकाश कोकणी, सुभाष राठोड, संजय गोसावी या तिघांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. वैद्यकीय तपासणीत राकेशने मद्यप्राशन केले असल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास संशयित राकेश चव्हाण यास कारागृहात दाखल करुन घेण्यात आले होते. दरम्यार संशयिताची कारागृहाबाहेर जबाबदारी ही सोबतच्या गार्ड पोलीस कर्मचार्‍यांची असते. तिघे कर्मचारी सोबत असतांना संशयिताने मद्यप्राशन केलेच कसे? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

शासकीय कामात अडथळा: गुन्हा दाखल

फिर्यादीत राकेश याने सबजेलला जायचे नाही, म्हणून मोठमोठ्याने आरडोओरड केली, तसेच अरेरावी केली, याबाब त पोलीस अधीक्षकांना फोनव्दारे कळविले, त्याचा राग आल्याने चव्हाण याने कर्मचार्‍यांना 5 हजार रुपये घेतले, अशी खोटी तक्रार देण्याची धमकी दिली व मोठ्यामोठ्याने आरडाओरड करुन सुभाष राठोड यांच्या हाताला हिसका देवून पळून जाण्याचा प्रयत्न केला, अशा आशयाच्या पोलीस कर्मचारी संजय गोसावी यांच्या फिर्यादीवरुन संशयित राकेश चव्हाण विरोधात जिल्हापेठ पोलिसात शुक्रवारी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या राकेश चव्हाण याने मद्यप्राशन केले असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे चव्हाणने मद्यप्राशन केले कसे? त्याला नातेवाईकांनी की पोलिसांनी दारु पाजली? याची चौकशी करण्यात येत आहे, यात गार्ड ड्युटीवरील तिघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यास तिघांवर कारवाई करण्यात येईल – डॉ. पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक