कै. रामभाऊ म्हाळगी योजना कार्यालयाचे उद्घाटन

0

कडूस । भाजपच्यावतीने कडुस येथे सुरू करण्यात आलेल्या कै. रामभाऊ म्हाळगी योजना कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच झाले. संसदपटु कै. रामभाऊ म्हाळगी हे कडुसचे सुपुत्र होते. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी या कार्यालयाचे नियोजन करण्यात आले आहे.

बाजारपेठेतील महाजन वाड्यात रामभाऊ म्हाळगी स्मृती भवनात या कार्यालयाची स्थापना करण्यात आली असून पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ता प्रशिक्षण ही सुरू करण्यात येणार आहे. सदरच्या कार्यालयात कडुस गणातील नागरिकांसाठी 138 सरकारी योजनांची माहिती, मोफत वाचनालय, गरीब विद्यार्थ्यांसाठी कम्प्युटर प्रशिक्षण, बेरोजगार तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवले जाणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. निवृत्ती नेहेरे, भिकाजी जाधव, प्रकाश कालेकर, प्रभाकर महाजन, बाळासाहेब ढमाले, प्रेम तुपे, तंटामुक्तीचे अध्यक्ष शामराव ढमाले आदी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी कै. रामभाऊ म्हाळगी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सांस्कृतिक सभागृह उभारण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन योगेश धायबर यांनी केले तर सूत्रसंचालन चांगदेव ढमाले यांनी केले.