नवी दिल्ली:लोकसभा २०१९ च्या रणधुमाळी सुरु झाली आहे. यासाठी काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. सत्तरच्या दशकात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘गरिबी हटाव’चा नारा दिला होता. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ‘न्याय स्किम’च्या माध्यमातून गरिबी हटावचा नारा दिला आहे. देशात कॉंग्रेस सत्तेत आल्यास महिन्याला १२ हजार रुपयांहून कमी उत्पन्न असणाऱ्या देशातील २० टक्के गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देण्यात येईल, अशी घोषणा राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
ही घोषणा करण्यापूर्वी अर्थतज्ज्ञांशी विचार विनिमय केला असून या योजनेचा देशातील ५ कोटी कुटुंबातील २५ कोटी लोकांना लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गेल्या पाच वर्षात देशातील गोरगरिबांची फसवणूक झाली आहे. देशातील जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे असे आरोप राहुल गांधीनी केले आहे.
याआधी काँग्रेसने २००९ मध्ये मनरेगाचा प्रयोग केला आहे. याआंतर्गत देशातील ग्रामीण परिवारांना १०० दिवसांच्या रोजगाराची हमी देऊन काँग्रेसने ग्रामीण भारतात चांगली पकड तर बनवली आणि पुन्हा सत्तेत देखील आली. २००७ मध्ये यूपीए-१ ने शेतकऱ्यांचे साधारण ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते.२०१८ च्या शेवटपर्यंत पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील प्रमुख राज्य मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कर्जमाफीचे आश्वासन देत काँग्रेस सत्तेवर आली आहे.