गरिबीवर वार, ७२ हजार; कॉंग्रेसचा भरभक्कम जाहीरनामा प्रसिद्ध

0

नवी दिल्ली-कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज कॉंग्रेसचा लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा जाहीर केला. या जाहीरनाम्यात प्रामुख्याने ५ महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शेतकरी, तरुणांना रोजगार, राष्ट्रीय सुरक्षा, शिक्षण, नोकरदार या मुद्द्यांचा समावेश आहे. मोदींनी आपल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने दिली होती, मात्र प्रत्यक्षात एकही आश्वासन पूर्ण केले नाही. परंतु आमच्या जाहीरनाम्यात कोणतीही खोटी आश्वासने नाही, याचा उल्लेख करत ‘गरिबीवर वार, ७२ हजार असे म्हणत राहुल गांधी यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला.

जाहीरनाम्यातील मुद्दे
*शेतकऱ्यांनी कर्ज फेडलं नाही, तर फौजदारी गुन्हा दाखल होणार नाही
*10 लाख युवांना ग्रामपंचायतीत नोकऱ्या देणार
*गरिबीवर वार, 72 हजार, या नुसार एका वर्षा ७२ हजार, तर ५ वर्षांमध्ये एकूण ३.६० लाख रुपये गरिबांच्या खात्यात जमा करणार
*शिक्षणावर जीडीपीच्या 6 टक्के खर्च करणार
*काँग्रेस सत्तेत आल्यास मनरेगा योजनेअंतर्गत 100 ऐवजी 150 दिवसांचा रोजगार देणार
*पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणणार
*मार्च 2020 पर्यंत 22 हजार पदे भरली जाणार
*काँग्रेस पार्टी मार्च 2020 पर्यंत देशातील सरकारी खात्यात 22 लाख नोकऱ्या देणार
*काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणार
*गरिबांसाठी किमान उत्पन्न देण्याची काँग्रेसची हमी, गरिबांचं किमान उत्पन्न 72 हजार करु
*तरुणांना उद्योगांसाठी 3 वर्षांसाठी कोणाचीही परवानगी घ्यावी लागणार नाही. बँकांचे दरवाजे खुले असतील.

काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात एकूण ५ सर्वात महत्त्वाच्या गोष्टींवर भर देण्यात आला असून त्यात न्याय ही सर्वात पहिली आणि मध्यवर्ती संकल्पना असल्याचे राहुल गांधी यांनी घोषित केले. जाहिरनाम्यात न्यायासह, रोजगार, आरोग्य, शिक्षण आणि शेतकऱ्यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आमच्या ‘मन की बात’ नसून जनतेच्या ‘मन की बात’ असल्याचे म्हणत राहुल यांनी पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ची खिल्ली उडवली.

स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प मांडणार
कॉंग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वे अर्थसंकल्पाच्या धर्तीवर शेतीचा वेगळा अर्थसंकल्प मांडला जाईल. शेतकऱ्यांनी वेळेत कर्ज न फेडल्यास त्यांना तुरुंगात जावे लागणार नाही अशी तरतूद केली जाईल असं या जाहीरनाम्यामध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान जनताच ठरवेल
जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर राहुल यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’चे आश्वासन दिले होते, मात्र चौकीदारानेच चोरी केली आहे हे सत्य आहे. मात्र चौकीदार लपू शकतो, पळू शकत नाही, अशा शब्दांत राहुल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मोदींना लक्ष्य केले. पंतप्रधानपदाच्या प्रश्नावर राहुल म्हणाले, की मी तर माझे काम करत आहे. पंतप्रधान बनवणे हे देशातील जनतेचे काम आहे. जनताच पंतप्रधान ठरवणार

देशात सर्वच हिंदू
पंतप्रधान मोदींवर टीका करताना राहुल पुढे म्हणाले, ‘देशात सर्वच हिंदू आहेत, मात्र देशाला सर्वाधिक गरज आहे ती रोजगाराची. देशाला शेतकऱ्यांची गरज आहे. देशाला न्यायाची गरज आहे. महिलांच्या सुरक्षेची गरज आहे, त्यांना आरक्षण देण्याची गरज आहे.’