नवी दिल्ली : कॉंग्रेसने आज लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. विविध घटकांना न्याय देणारा असा हा जाहीरनामा असल्याचे राहुल गांधींनी सांगितले. गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देण्याची घोषणा देखील कॉंग्रेसने केली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या ‘न्याय’ योजनेवर टीका केली आहे. काँग्रेसची ‘न्याय’योजना म्हणजे गरीबांना गरीबच ठेवण्याचा कट रचल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. कालाहाडी जिल्ह्याच्या भवानीपाटना येथील कृष्णा नगर मैदानात मोदींनी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि बीदू दल दोघांवर हल्ला चढवला.
2017 मध्ये उत्तर प्रदेश आणि 2018 मध्ये त्रिपूरामध्ये रचलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. राज्य सरकारचा सहयोग नसूनही मी तुमच्यासाठी काम केले असे मोदी म्हणाले. देशात सकारात्मक बदल, गरीबांच्या आयुष्यात प्रकाश, त्यांना जगण्याची उमेद तुमच्या मताने येते ही मोदीमुळे नव्हे असेही ते यावेळी म्हणाले. ओडीसा सरकारने आम्हाला सहयोग केले नाही. त्यांच्या उदासिनते नंतरही आम्ही राज्यात विकासाच्या योजना सुरूच ठेवल्या असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
काँग्रेसने दिलेल्या आश्वासनानुसार, पुढच्या सहा महिन्यांत सर्व सरकारी पदांवर भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. हा आकडा जवळपास २२ लाखांवर आहे. तसेच जीएसटी १२ टक्क्यांवर आणत जीएसटीचा स्लॅब केवळ एकच असेल असेही सांगण्यात आले आहे. निर्यात करण्यात येणाऱ्या वस्तुंवर कोणत्याही प्रकारचा जीएसटी आकारला जाणार नाही. पूर्वेत्तर राज्यांत सिटिझन चार्टर रिव्ह्यू केला जाईल. यासोबतच या राज्यांच्या विकासावर भर दिला जाईल असे आश्वासनही देण्यात आले. जम्मू – काश्मीरचा विकास ही प्राथमिकता असेल असे आश्वासनही काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.