मुंबईः राज्यात सत्ता स्थापन करण्याला कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी विलंब केल्याचा आरोप कॉंग्रेसच्या आमदारांनी केला आहे. राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचे सरकार आल्यानंतर काँग्रेस आमदारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. राज्याच्या या परिस्थितीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जबाबदार असल्याचा आरोप आता काँग्रेसचे आमदार करीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यात भाजप वगळून शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याची संधी आघाडीला होती. परंतु, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सत्तास्थापनेसाठी खूप उशीर केला. चर्चेच्या नावाखाली वेळकाढूपणा केल्याने त्याचा थेट फायदा भाजपला झाल्याची भावना या काँग्रेसच्या आमदारांमध्ये आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कधी दिल्लीत तर कधी मुंबईत बैठका घेणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठींब्याचे पत्र देण्यास उशीर केला.
त्यामुळे शिवसेनेला संख्याबळ अभावी राज्यात सत्ता स्थापन करता आली नाही. राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना तसेच शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांचं सरकार स्थापन होणार असताना आज राज्यात भल्या पहाटे राजकीय भूकंप झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. फडणवीस यांच्यासोबतच आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात राज्यपालांनी फडणवीस व अजित पवार यांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे.