कॉंग्रेसचे हे नेते होणार मंत्री

0

मुंबई: महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. आज होणाऱ्या मंत्रीमंडळात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे ३६ मंत्री शपथ घेणार आहे. कॉंग्रेसच्या कोट्यात आठ व दोन राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. काँग्रेसच्या यादीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाचाही समावेश आहे. त्याशिवाय ज्येष्ठ आमदार के.सी. पाडवी, माजी विरोधी पक्षनेते विजय वड्डेवटीवार, अमित देशमुख आदींचा समावेश आहे. काँग्रेसने दोन महिलांना मंत्रिमंडळात स्थान दिले असून यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमधून भाजपला हद्दपार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या सतेज उर्फ बंटी पाटील हे राज्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला हात देणाऱ्या विदर्भातून सुनील केदार, यशोमती ठाकूर, विजय वड्डेवटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. नितीन राऊत यांनी सरकार स्थापनेच्या वेळी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे विदर्भातून चार कॅबिनेट मंत्री असणार आहेत.

मुंबईतून काँग्रेसच्या तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या वर्षा गायकवाड व अस्लम शेख यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. हे दोघेही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. नंदुरबार अक्कलकुवाचे आमदार के. सी. पाडावी यांनादेखील कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव मंत्रिमंडळाच्या विस्तारात नाही. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर येण्याची दाट शक्यता आहे.