कॉंग्रेसच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने मोदींच्या ‘रोड शो’चा अहवाल मागविला

0

अहमदाबाद:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहमदाबादमध्ये झालेल्या ‘रोड शो’मध्ये आचारसंहितेचा भंग केल्याचे आरोप करत कॉंग्रेसने चौकशीची मागणी केली. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरातमधील मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडून अहवाल मागितला आहे.

देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना काल पत्रकारांशी बोलताना पंतप्रधानांच्या रोड शोबाबतचा अहलवाल मागवला असल्याची माहिती वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा यांनी दिली. प्रथमदर्शनी पंतप्रधानांनी निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केले नसल्याचे गुजरातमधील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, या बाबत आयोगाने कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये केलेल्या ‘मोदीजी की वायु सेना’ या कथित टिप्पणीबाबत प्रश्न विचारला असता, या बाबत सविस्तर माहिती घेण्यात येणार असून पुढील २ ते ३ दिवसांमध्ये ते स्पष्ट होईल, असे उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार यांनी म्हटले आहे.