कॉंग्रेसच्या आशा कायम; पायलट यांना परतण्याचे आवाहन

0

जयपूर: राजस्थानमध्ये बंडखोरी करणारे सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसने काल कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष पदावरुन त्यांना दूर केले आहे. सचिन पायलट हे आता कॉंग्रेसमध्ये परत येतील हे जवळपास अशक्यच आहे. मात्र अजूनही काँग्रेसला सचिन पायलट परत येतील ही आशा कायम आहे. कॉंग्रेसकडून पुन्हा सचिन पायलट यांना परत स्वगृही परतण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. ‘सचिन पायलट हे अतिशय होतकरू आणि हुशार व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्यावर आम्हाला जड अंत:करणाने कारवाई करावी लागली आहे. ते पक्षावर नाराज असतील तर त्यांनी उदार मनाने परत येऊन चर्चा करावी असे आवाहन कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केले आहे. कॉंग्रेस नेतृत्त्वाने त्यांना परत येण्याची विनंती केली असून त्यांनी परत येऊन त्यांनी पुन्हा कॉंग्रेसच्या उभारणीत काम करावे असे आवाहन सुरजेवाला यांनी केले आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सचिन पायलट व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना परत येण्याचे आवाहन केले आहे. ‘मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत काही मतभेद असतील तर पक्षासमोर मांडावे. काँग्रेस पक्ष तुमच्या तक्रारी ऐकण्यासाठी तयार आहे. अनेक वेळा त्यांना पक्षाने परत येण्याची विनंती केली, असे रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.

सचिन पायलट यांनी भाजपात जाण्यास नकार दिला आहे. आज सकाळी त्यांनी माध्यमांना ही माहिती दिली. भाजपात जाण्याचा विचार नसेल भाजपच्या नेत्यांशी चर्चा करणे बंद करा. हरियाणा सरकारच्या ताब्यात असलेल्या प्रदेशातील हॉटेलमध्ये का थांबले आहात?. मनोहरलाल खट्टर यांची मेजवानी स्वीकारू नका, असेही रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले आहे.