नवी दिल्ली – लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेसने काल जाहीरनामा प्रसिद्ध केला. शेतकरी, बेरोजगार तरुणांना रोजगार, महिला सुरक्षा, शिक्षण आदी विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. असे असले तरी कॉंग्रेसच्या या जाहीरनाम्यावर भाजपने टीकेची झोड उठवली आहे. परंतु आता काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जाहीरनामा पुस्तिकेच्या कव्हर पेजवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा फोटो लहान आकारात छापल्यामुळे आक्षेप दर्शवला आहे.
सोनिया गांधी यांनी जाहीरनामा कमिटीचे सदस्य राजीव गौडा यांना चांगलेच फटकारले आहे. जाहीरनामा पुस्तिकेचे कव्हर पेज लोकांना आकर्षित करण्यासारखे असायला हवे. मात्र तसे झाले नाही. त्याचसोबत राहुल गांधी यांचा फोटो मोठ्या आकारात छापणे गरजेचे होते पण छोट्या आकाराचा फोटो छापण्यात आला आहे असे सोनिया गांधी यांचे म्हणणे आहे.
जाहीरनाम्यात दिलेले आश्वासने चांगली असली तरी कव्हर पेज लोकांना आकर्षित करणारे नाही. ज्यावेळेला काँग्रेसच्या जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रम सुरु होता त्याचवेळी सोनिया गांधी यांनी राजीव गौडा यांना फटकारले. व्यासपीठावर जाण्याअगोदर सोनिया यांनी राजीव गौडा यांना सुनावले. यावेळी गौडा यांनी सोनियांना समजवण्याचा प्रयत्न केला तरीही सोनिया गांधी संतुष्ट झाल्या नाहीत. पूर्ण कार्यक्रमादरम्यान सोनिया गांधी यांनी मौन बाळगले. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थितांना सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता असं सांगितल्यावर सोनिया यांनी प्रश्न घेणे टाळले.