भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये सत्तेत आल्यानंतर लगेचच कॉंग्रेसने कर्जमाफी केली. मात्र ही कर्जमाफी फसवी असल्याचे आरोप भाजपकडून केले जाते. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून कॉंग्रेसने केलेल्या कर्जमाफीवर सातत्याने टीका होत असते. दरम्यान कॉंग्रेसने या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे नेते चक्क कर्जमाफीच्या कागदपत्रासह शिवराजसिंह चौहानयांच्या घरी गेले. यावेळी कर्जमाफीचे पुरावे देण्यात आले.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी आणि मध्य प्रदेशमधील मंत्री पीसी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शिवराज चौहान यांची भेट घेतली. या भेटीमध्ये शिष्टमंडळाने कर्जमाफी केल्याचे पुरावे म्हणून दस्तावेज दिले. तब्बल एक गाडी भरुन हे दस्तावेज शिवराज चौहान यांच्या घरी आणून त्यांच्यासमोर ही सगळी कागदपत्रे ठेवण्यात आली. शिवराज चौहान यांना देण्यात आलेली सर्व कागदपत्रे हे शेतकरी कर्जमाफीचे पुरावे आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांची नावे, त्यांचे मोबाईल नंबर, कर्जमाफीचे प्रमाणपत्र, कोणत्या बँकेचे कर्ज घेतले यासह संपूर्ण माहिती देण्यात आली असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला.
मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडून कृषी विभागाचे दस्तावेज मला पाठवण्यात आले. मला बँकेची यादी द्यावी कारण बँकांकडून कर्जमाफी केली जाणार आहे. फक्त वातावरण खराब करण्यासाठी आणि शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी असा प्रकार काँग्रेसकडून करण्यात आला. फक्त यादी बनविल्याने कर्जमाफी होत नाही. 48 हजार कोटींची कर्जमाफी देणार सांगितले अन् फक्त 1300 कोटी रुपये दिले तर कर्जमाफी कशी होणार? असा सवाल शिवराज चौहान यांनी काँग्रेसला केला.