यवतमाळ- गेल्या अनेक वर्षात अनेक सरकारे बदललीत, माणसे बदललीत; परंतु समस्या मात्र त्याच आहेत. केवळ भूलथापांच्या बळावर सत्ता भोगणाऱ्या राजकारण्यांनी देशाचे, पर्यायाने महाराष्ट्राचे वाटोळे केले. यापूर्वीचे कॉंग्रेस आणि आताचे भाजपा सरकारदेखील थापाडे आहे, असा घणाघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केला.
आज वणी (यवतमाळ) येथे मनसे कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर, हेमंत गडकरी, संजय चित्रे, अनिल शिदोरे, विठ्ठल लोखंडकर, आनंद एंबडवार, राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, राजेश कदम उपस्थित होते.
राज ठाकरे यांनी विदर्भात आल्यानंतर सर्वप्रथम अमरावती जिल्ह्याचा दौरा केला. तेथील सामान्यांच्या समस्या पाहून व्यथीत झालो. आपण केवळ कॉंग्रेसलाच शिव्या घालतो. परंतु भाजपा सरकार त्याहीपेक्षा बनावट आहे. त्यामुळे आधीच्या आणि आताच्या सरकारला बाजुला सारा आणि फक्त एकदा राज ठाकरेच्या हातात सत्ता देऊन बघा, असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून केले, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मोदींवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोडी म्हणतात दीड कोटी घरे बांधलीत, ही घरे आम्ही शोधायची कुठे? हे लोक कुठून आकडे आणतात आणि आपल्यापुढे फेकतात आणि आपणही या आकड्यांना भुलतो, असे राज ठाकरे म्हणाले. सर्वच राजकीय पक्ष खोटारडे आहेत. मात्र माध्यमातून हा खोटारडेपणा लिहला जात नाही वा दाखवला जात नाही, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली. आता केवळ घोषणा देऊन चालणार नाही, तर प्रत्येक मनसे सैनिकांनी घरोघरी जाऊन ही वस्तुस्थिती लोकांना सांगितली पाहिजे. लोकांना जागृत केले पाहिजे, असे ते म्हणाले.