मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस, राष्ट्रवादीला गळती लागली आहे. एकापाठोपाठ एक नेते भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. दरम्यान आता काँग्रेसचे वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी अखेर काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. येत्या बुधवारी ३१ जुलै रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. बुधवारी कोळंबकर यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे मातब्बर नेते गणेश नाईक, आमदार वैभव पिचड आणि चित्रा वाघ यांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे.
कालिदास कोळंबकर यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचाही आज सोमवारी राजीनामा दिला. कोळंबकर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज होते. वेळोवेळी त्यांनी त्याबद्दल जाहीर वाच्यताही केली होती. एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचारही केला होता. त्यामुळे कोळंबकर शिवसेनेत जाणार असल्याचा कयास वर्तवण्यात येत होता. मात्र, दोन दिवसांपूर्वीच कोळंबकर यांच्या कार्यकर्त्यांनी ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या वृत्ताला दुजोराही दिला होता. वडाळा विधानसभा मतदारसंघातून ते सातवेळा निवडून आले आहेत. २०१४च्या निवडणुकीत देशात आणि राज्यात मोदीलाट असतानाही कोळंबकर यांनी भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा पराभव केला होता.