चंदिगड: लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभवानंतर अनेक नेत्यांनी पक्ष सोडले आहे. अजूनही कॉंग्रेस समोरील अडचणी काही संपण्याचे नाव घेत नाही आहेत. आता हरियाणामध्ये काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. राज्यात दीर्घकाळापासून काँग्रेसचा चेहरा असलेले भूपेंद्रसिंह हुड्डा आज रविवारी रोहतक येथे महापरिवर्तन सभेत समर्थकांना संबोधित करणार असून, या सभेत हुड्डा हे वेगळ्या पक्षाची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे.
भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी शनिवारी दिल्लीत काँग्रेसच्या अनेक आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली. मात्र पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट न झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर भूपेंद्रसिंह हुड्डा आज रोहतक येथे महापरिवर्तन रँलीला संबोधित करणार आहेत. यावेळी ते नव्या पक्षाची घोषणा करतील किंवा राज्यात इतर पक्षांक्षी आघाडी करून निवडणूक लढवतील, असे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत हरियाणामध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे राज्यात नेतृत्वबदल करण्याचा पक्षश्रेष्ठींचा विचार आहे. मात्र दीर्घकाळापासून काँग्रेसमध्ये असलेल्या भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभा निवडणूक लढवण्यात यावी आणि त्यांनाच पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उमेदवार घोषित करावे, असा हुड्डा यांच्या समर्थकांचा आग्रह आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सभेत हुड्डा काय घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.