कॉंग्रेसला विरोध सुरु ठेवायचा असेल तर मी राजीनामा देण्यास तयार-कुमारस्वामी

0

बंगळूर- कर्नाटकचे मुख्यमंत्री जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी सिद्धरामय्यांच्या समर्थकांकडून होत असलेल्या विरोधामुळे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्रीपद सोडण्याची धमकी दिली आहे. काँग्रेसचे आमदार आपल्या मर्यादा ओलांडत असून काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर लगाम लावावा असे त्यांनी म्हटले आहे.

सिद्धरामय्या यांच्या समर्थकांच्या विरोधामुळे कुमारस्वामी यांनी ही भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाला या सर्व मुद्द्यांकडे पहावे लागेल. मी या गोष्टीने खूपच चिंचित आहे. जर त्यांना हेच सुरु ठेवायचे असेल तर मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. ते मर्यादा ओलांडत आहेत, काँग्रेस नेत्यांना आपल्या आमदारांवर नियंत्रण ठेवावे लागेल.

कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या धमकीवर काँग्रेसकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी. परमेश्वर यांनी म्हटले की, सिद्धरामय्या हे सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री राहिले आहेत. ते आमच्या काँग्रेस आमदारांचे नेते आहेत. आमदारांसाठी तेच मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आपले मत मांडले आहे, यामध्ये चुकीचे काय आहे. आम्ही कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्री असण्याने खुश आहोत.