मुंबई: राज्यातील सत्ता स्थापनेचा संगर्ष अधिकच वाढला आहे. राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले होते. ती वेळ देखील आज ८.३० वाजता संपणार आहे. मात्र अद्याप सत्ता स्थापनेबाबत ठोस असा निर्णय झालेला नाही. दरम्यान आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्व आमदारांची बैठक बोलविली होती. ही बैठक संपली असून सत्ता स्थापनेबाबत कॉंग्रेसशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल अशी चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. कॉंग्रेसचे केंद्रातील वरिष्ठ नेते शरद पवारांच्या भेटीला मुंबईत येत आहे. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा आणि शिवसेनेला पाठींबा देण्याचा किंवा पाठींबा घेण्याबाबतचा निर्णय होणार आहे.
मात्र राज्यपालांनी दिलेली वेळ संपणार असल्याने राज्यावर राष्ट्रपती राजवटीची टांगती तलवार आहे. राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतचा अहवाल गृहमंत्रालयाला दिल्याची चर्चा सुरु झाली आहे.