नवी दिल्ली : सध्या देशात कॉंग्रेसची अवस्था बिकट आहे. दोन-तीन राज्य वगळता कॉंग्रेसला कोठेही स्वबळावर सत्ता मिळविता आलेली नाही. कॉंग्रेसचे नेतृत्व चांगल्या हातात देण्याची मागणी होत आहे. दरम्यान काँग्रेसला उभारी द्यायची असेल तर काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला पाहिजे असे वक्तव्य काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी केले आहे. दिल्लीच्या दिवंगत मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित यांनी काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळत नसल्याबद्दल वरिष्ठ नेत्यांना जबाबदार धरले आहे. याच वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया देताना काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जावी, असे मत शशी थरुर यांनी व्यक्त केले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मतभेद दिसून येत आहे. शशी थरुर यांनी यापूर्वीही अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याबाबत वक्तव्य केले होते.
पक्षात सहा ते आठ जण असे आहेत जे नेतृत्त्व करण्यासाठी सक्षम आहेत. पण अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकायची याची भीती वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे, असे म्हणत त्यांनी वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सोनिया गांधी सध्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. नवीन अध्यक्षपदावरुन काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.