कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मनुवादाचा पराभव करण्यासाठी सज्ज राहावे – मल्लिकार्जुन खर्गे

0

मुंबई : कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मनुवादाचा पराभव करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुंबई कॉंग्रेसने संविधान बचाव परिषदचे आयोजन केले होते.

यावेळी खर्गे म्हणाले की, निवडणूक जवळ आल्या की, नरेंद्र मोदी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आठवतात. मोदी यावेळी त्यांच्या पुतळ्यांना नमस्कार करतात, पण सत्तेत बसून बाबासाहेबांचे संविधान नष्ट करण्याचे उद्योग सुरु आहेत.आगामी निवडणूक ही संविधान विरुद्ध मनुस्मृती अशी असणार आहे, असेही खर्गे म्हणाले. या कार्यक्रमात संजय निरुपम, राम पंडागळे, खासदार हुसेन दलवाई, माजी खासदार एकनाथ गायकवाड, माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची भाषणे झाली. तर कॉंग्रेसचे माजी मंत्री मिलिंद देवरा आणि प्रिया दत्ता अनुपस्थित होते. विशेष म्हणजे हा कार्यक्रम प्रिया दत्त यांच्या मतदार संघात आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या न येण्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.