नवी दिल्ली-केंद्र सरकार जनतेच्या कल्याणासाठी दिल्लीतून जो पैसा पाठवते त्यांपैकी केवळ १५ टक्केच त्यांच्यापर्यंत पोहोचतात, याची कबूली माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी दिली होती. याचे उदाहरण देत हीच संस्कृती आमच्या भाजप सरकारने बदलली, असे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट काँग्रेसवर निशाणा साधला.
इतकी वर्षे देशावर ज्या पक्षाने सत्ता गाजवली. त्यांनी देशाला जी व्यवस्था दिली ती त्यांनी स्विकारली होती. मात्र, गेल्या १०-१५ वर्षांच्या काळातही त्यांनी ही लूट थांबवली नाही. ही गळती बंद करण्याचा प्रयत्न केला नाही. देशाचा मध्यम वर्ग इमानदारीने कर भरत राहिला आणि जो पक्ष इतकी वर्षे सत्तेत राहिला तो पक्ष ही ८५ टक्क्यांची लूट पाहूनही त्याकडे दुर्लक्ष करीत राहिला, मात्र आमचे सरकार आल्यानंतर आम्ही ही १५ पैशांवाली संस्कृती बदलून टाकली.
गेल्या साडेचार वर्षांत आमच्या सरकारने विविध योजनांच्या माध्यमांतून सुमारे ५ लाख ७८ हजार कोटी रुपये जनतेच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरीत केले आहेत. जगभरातील आपल्या राजदूतांनी आणि उच्चायुक्तांना पासपोर्ट सेवा प्रकल्पाशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांसाठी पासपोर्टसंबंधी सेवांसाठी केंद्रीय यंत्रणा राबवण्यात आली. आता याच्याही पुढचे पाऊल आम्ही टाकत असून आता चीप असलेले ई-पासपोर्ट आम्ही आणत आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.