कॉंग्रेस नेते माजी मंत्री रवीशेठ पाटील भाजपात !

0

मुंबई- काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. ते काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज असल्याने त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या भाजपात प्रवेशामुळे पूर्वी रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसला आहे.

पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपासून संघटनेपासून अलिप्त राहणे पसंत केले होते. दरम्यान, भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्याशी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सलगी केल्याने, जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पसरले होते. बॅरिस्टर अंतुले यांच्या पश्चात जिल्हय़ात दांडगा जनसंपर्क असलेल्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.

पेण विधान मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेल्या रविशेठ पाटील यांना आघाडी सरकारच्या पहिल्या टप्प्यात राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळाली होती. अंतुलेंचे अत्यंत विश्वासू सहकारी अशीही त्यांची ओळख होती. जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले होते. मात्र, २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अनिल तटकरे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आणि रविशेठ पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१४ मध्येही त्यांना पराभवाला सामोर जावे लागले.

शिवसेनेकडूनही त्यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न केले गेले होते. मात्र, स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या प्रस्थापीत नेत्यांकडून त्यांना विरोधाची शक्यता होती, असे झाल्यास आपली पुढील राजकीय वाटचाल अडचणीत येऊ शकते याची जाणीव त्यांना झाली होती. त्यामुळे त्यांच्या शिवसेनेत प्रवेशाचा मुद्दा काहीसा मागे पडला होता.