मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने देत आहे. कॉंग्रेसने याअगोदर दरवर्षी गरिबांना ७२ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, दरम्यान आता त्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे आणि सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्या तरुणांसाठी फायदेशीर ठरणारी अशी घोषणा केली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास सरकारी नोकरीसाठी भरण्यात येणारे परीक्षा शुल्क रद्द केला जाईल असे आश्वासन राहुल गांधीनी दिले आहे.
काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात गरिब आणि तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले. तर भाजपने मध्यमवर्गीयांना केंद्रबिंदू ठेवले असून राष्ट्रवादावर अधिक भर दिला आहे. देशातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचा दावा काँग्रेससह विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने रोजगार उपलब्ध करून देणे आणि देशभरात रिक्त असलेले लाखो सरकारी पदे भरण्याचे आश्वासन दिले आहे. तर भाजपने रिक्त असलेले सरकारी पदे भरण्यासंदर्भात काहीही म्हटले नाही.
देशात आणि राज्यात अनेक तरुण स्पर्धा परिक्षांची तयारी करतात. अनेकदा जागा कमी निघतात, त्यामुळे अनेकांना नोकरीपासून वंचित राहावे लागते. परंतु, नोकरीसाठी आधीच मोठ्या प्रमाणात शुल्क भरावे लागते. नोकरी मिळाली नाही, की भरलेली रक्कम देखील तशीच जाते. काँग्रेस अध्यक्षांनी ही गोष्ट लक्षात घेत पदभरतीसोबतच तरुणांना अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या शुल्काची देखील काळजी घेतली आहे.