कॉग्रेसला कंटाळून नारायण राणेंची शिवसेनेकडे घरवापसी? 

0

कुडाळ : मंत्रीपद देऊनही दिपक केसरकर यांना सिंधूदुर्ग जिल्ह्यात कुठलीही चमक दाखवता आलेली नसल्याने पक्षप्रमुख नाराज आहेत आणि त्याचाच फ़ायदा घेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या घरवापसीचे प्रयत्न जोरात सुरू असल्याच्या गप्पा जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे संपुर्ण कोकण एकहाती शिवसेनेच्या भगव्याखाली येईल आणि राणे यांच्यासारखा आक्रमक नेता सेनेत दाखल झाल्याने भाजपासह अन्य पक्षांशी सेनेला लढण्यास मोठे बळ मिळेल अशी अपेक्षा आहे.

कॉग्रेस पक्षालाच आता भवितव्य उरले नसल्याने त्या पक्षात आपल्यालाही भविष्य नसल्याच्या निष्कर्षाप्रत राणे आलेले आहेत. उत्तरप्रदेशसह पाच विचानसभांच्या मतदानाचे निकाल भाजपाच्या बाजूने गेल्यास राणेंच्या घरवापसीला वेग येईल असे सांगितले जाते. काही व्यवहारात राणे यांना केंद्रातील अंमलबजावणी खात्याचा त्रास होत असून, त्यात कॉग्रेसश्रेष्ठीही पाठराखण करत नसल्याने राणे वैतागले असल्याचे सुत्रांकडून सांगितले जाते. त्यामुळेच त्यांना भाजपा वा शिवसेनेत दाखल झाल्यास दिलासा मिळू शकणार आहे.

मात्र सिंधूदुर्गातील वैभव नाईक व दिपक केसरकर अशा दोन्ही सेनानेत्यांची सहमती या घरवापसीला कितपत मिळू शकेल याची शंका आहे. त्याही दोन नेत्यांमध्ये आपसात बेबनाव असल्यानेच सेनेला त्या जिल्ह्यात जिल्हा परिषद मतदानात आपला ठसा उमटवता आला नाही. शिवसेने्कडे सध्या कुठलाही ग्रामिण चेहरा नसल्याने राणे तिथे उपयोगी ठरू शकतील, असे मानले जाते. मात्र जुन्या वादातून इतक्या लौकर त्यांना सेनेची दारे उघडली जातील काय, याची अनेकांना शंका आहे. पण अफ़वा मात्र जोरात आहेत.