कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये जळगाव शहरात आणखी तीन रुग्ण

जळगाव । गेल्या आठवड्यात जळगाव शहरात कोरोनाचे चार रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) केली जात असून, त्यामध्ये आणखी तीन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या नवीन रुग्णांमध्ये एका बाळाचाही समावेश आहे.

गेल्या आठवड्यात (दि.26) शहरात चार रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी तीन जण हे नाशिकला गेले होते. तेथे ते एका कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण झाली. प्रशासन या तीन जणांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी करवून घेत असून, त्यामध्ये आणखी तीन जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका बाळाचा समावेश आहे. या रुग्णांपैकी दोन जण शिवाजीनगरमधील, तर एक जण संत गाडगेबाबा नगरमधील आहे. या तिघांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. आता या नवीन तीन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी केली जाणार आहे.