‘कॉपीमुक्त’चा फज्जा; मायमराठीच्या पेपरला कॉप्यांचा पाऊस

0

दहावीचा पहिल्याच पेपरला शिक्षण विभागाच्या सर्व उपाययोजना ठरल्या फोल

जळगाव– शहरासह जिल्ह्यात दहावीच्या बोर्डाच्या परिक्षांना मंगळवारी सुरुवात झाली. बारावीप्रमाणेच दहावीच्या पहिल्याच पेपरला मायमराठी पेपरला कॉप्यांचा पाऊस पडला. विभागाच्या सर्व उपाययोजना फोल ठरल्याने कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. शहरात अनेक केंद्रावर परिक्षार्थी उमेदवाराला कॉपी पुरविणार्‍यांची चंगळ दिसून आली. चक्क केंद्राच्या छतावर चढून तर काही ठिकाणी दहा ते 15 फुट उंचीच्या भिंतीवरुन कॉपी पुरविणार्‍या तरुणांच्या कसरतीही अनुभवायला मिळाल्या. काही केंद्रावर बाहेरुन स्मशानशांतता दिसून आली असली तरी वर्गात मात्र बिनधास्तपणे कॉप्या केल्या जात असल्याचे चित्र दिसून आले. बारावीप्रमाणे दहावीच्या परीक्षांनाही विभाग अपयशी ठरल्याचे दिसून आले.

अंगझडतीनंतरही वर्गात कॉप्याच कॉप्या

सध्या शहरात बारावी परीक्षा सुरू आहेत़ त्याचबरोबर मंगळवारपासून दहावीच्या परीक्षेलाही सुरूवात झाली़ अक्षरश: दहा ते पंधरा फुटाच्या भिंतींवर चढून तरूणांकडून कॉपी पुरविण्यासाठी धडपड सुरू होती़ सकाळी 11 वाजता पेपर असल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांसह पालकांनी परीक्षा केंद्राबाहेर 10़30 वाजताच हजेरी लावली़ नंतर विद्यार्थ्यांची अंगझडती घेतल्यानंतर केंद्रात प्रवेश देण्यात आला़ तासभर परीक्षा केंद्रांवर मराठी विषयाचा पेपर सुरळीत चालला़ मात्र, दुपारी 12 वाजेनंतर बहुतांश केंद्रांवर अक्षरश: कॉप्यांचा पाऊस पडला़ नूतन मराठा विद्यालयाच्या मागील बाजूने खिडक्यांमधून कॉप्यांचा पाऊस पडत होता़ तर अँग्लो उर्दू हायस्कूलच्या मागील बाजूस चक्क कॉप्यांची गड्डी घेवून तरूण फिरत होते़

प्रवेश नाकारल्याने टवाळखोरांकडून वाद

परीक्षार्थी विद्यार्थ्याला दहा मिनिटांच्यावर केंद्रांवर येण्यास उशिर झाल्यास त्यास प्रवेश देऊ नये अशा सक्त सूचना नाशिक विभागीय मंडळाचे विभागीय सचिव नितीन उपासनी यांनी दिले आहे़ त्यात नूतन मराठा विद्यालयाच्या केंद्रांवर दहा मिनिटं उशिरानंतर विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचला़ त्यास केंद्रसंचालकांनी प्रवेश नाकारला़ त्यामुळे त्या विद्यार्थ्याने चक्क दहा ते पंधरा जणांना घेवून येत वाद घातल्याची माहिती सूत्रांकडून मिळते़ त्यानंतरही त्या विद्यार्थ्यास प्रवेश नाकारण्यात आला़

कॉपी पुरविणार्‍यांनी टोकली धूम

नूतन मराठा महाविद्यालय, गुळवे विद्यालय तसेच अँग्लो उर्दु विद्यालयाच्या परिसरात कॉपी पुरविण्यासाठी टवाळखोरांनी चांगलीच गर्दी केली होती़ मात्र, केंद्रसंचालकांकडून याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस कर्मचारी मंजुळा तिवारी तसेच जिल्हापेठ पोलिसांनी परीक्षा केंद्र परिसरात गस्त लावत टवाळखोरांना पिटाळून लावले़ गुळवे विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर टवाळखोरांनी गर्दी केली होती़ त्याच क्षणी जिल्हापेठ पोलिसांचे डिबी पथक येताच त्या टवाळखोरांनी तेथून पळ काढला़ दरम्यान, पथकाने तब्बल तीनशे ते चारशे मीटरपर्यंत त्या तरूणांचा पाठलाग करून त्यांना पिटाळून लावले़

बिनधास्तपणे फिरत होते तरुण

शहरातील अँग्लो उर्दु हायस्कूलच्या मागील बाजूने काही तरूणांकडून कॉपी पुरविण्यासाठी कसरती सुरू होत्या़ त्यातच एका तरूणाच्या हातात चक्क कॉप्यांची गड्डी होती़ परिसरात पोलीस नसल्यामुळे हे तरूण बिनधास्त कॉपी हातात घेऊन मिरवताना दिसून आले़ नंतर अधून-मधून संधी साधत भिंतींवर चढून कॉपी पुरवताना दिसले़ खुबचंद सागरमल विद्यालयाच्या भिंतीवर चढून कॉपी पुरविण्यासाठी तरूणांच्या कसरती सुरू असल्याचे दिसून आले़

पत्र्यांवर चढवून पुरविली कॉपी

नूतन मराठा विद्यालयाच्या मागील बाजूला कॉपी पुरविण्यासाठी तरूणांची दुपारी 1 वाजता चांगलीच गर्दी झाली होती़ यात तरूणांनी चक्क दहा ते पंधरा फुटाच्या उंचीच्या पत्र्यांवर चढून कॉपी पुरवित होते़ दुसरीकडे काही तरूण दगडात कॉपी अडकवून खिडक्यांच्या दिशेने फेकत होता़ प्रकार कळताच केंद्र संचालकांनी पोलिसांना माहिती दिली़ व पोलिसांचे पथक विद्यालयात धडकले होते़ दरम्यान, खिडक्यांमधूनही कॉपी केल्यानंतर कागदाच्या चिट्टयांचा पाऊस पडताना दिसून आला़

पोलीस कमी, पण कारवाई जोमाने

यंदा होमगार्ड नसल्यामुळे परीक्षा बंदोबस्ताची संपूर्ण जबाबदारी ही पोलीस प्रशासनावर आली आहे़ त्यात पोलीस संख्या कमी असताना सुध्दा गस्त पथकांकडून तब्बल तीन तास विविध केंद्रांवर भेटी दिवून टवाळखोरांना पळवून लावित होते़ त्यामुळे बैठे पथकाचे निम्मे काम पोलीस प्रशासनाकडून होत असल्याचे चित्र बघायला मिळाले़