सुरुवात करतोय ती एका परीक्षा केंद्रावर घडलेल्या बघितलेल्या प्रसंगावरुनं. बारावीची परीक्षा, पहिला दिवस. सगळीकडे ‘चोख’ बंदोबस्त. शाळेचे मुख्यगेट बंद बाहेर दोन (तरुण) पोलिसांचा बाईकवर बसून, हातात मोबाईल घेऊन बंदोबस्त सुरु त्यांच्या भोवती 5/6 तरुण मुलं. पेपर सुरु होऊन 20 मिनिट झालीये तेवढ्यात दुसर्या मजल्यावरनं परीक्षार्थी विद्यार्थ्यांची फर्माईश येते- उत्तरं पाठवा! एक स्कूटरवाला खालून सांगतो. प्रश्नपत्रिका आत्ताच व्हाटसअप वर आलीये. 20/25 मिनिटं थांबा. पुढे रितसर वर्गावर्गामध्ये झाडावर चढून, खिडकीतून कॉप्या पुरवल्या जातात. पोलीसदादा सारं पहाताय उघड्या डोळ्याने. तेवढ्यात भरारी पथक येतं. सारं ‘छान चाललेय’ म्हणत येतं तसं परत जातं. मी माझाचं पराभव ‘बघत’स्वीकारत वर्गावर्गांमध्ये (मोबाईलसह) सुपरव्हिजन करणार्या मास्तरांना सलाम करतो तेवढ्यात एक वर्तमानपत्राचा प्रतिनिधी मला भेटतो. तोही सारं चित्र ‘बघून’ अवाक होतो. बातमी करतो परत जातो व मीही घरी परततो.
परीक्षा, ती 5 वीची असो व दहावी-बारावीची, परिस्थिती आणीबाणीची प्रचंड टेन्शनची. परीक्षा म्हणजे जणू जीवनमरणाचा प्रश्न परीक्षेतील (नकली) गुण म्हणजे प्रचंड यश. परीक्षा म्हणजे प्रचंड कसोटीचा क्षण. म्हणून कोणत्याही मार्गाने यश हवंच. मागे एका शिक्षकाने आपल्या दहावीत शिक्षणार्या मुलासाठी जेव्हा सारे (कॉपीचे) प्रयत्न केले तेव्हा तो मला म्हणाला होता, सर, इतर मुलांबरोबर माझ्याही मुलाचं भलं जोत असेल तर त्यात काय बिघढलं हो? खरंच बिचार्याचे. पण खरा प्रश्न आहे तो वर्गावर्गामध्ये अतिशय प्रामणिकपणे व अभ्यासू नजरेने उत्तर लिहिणार्या विद्यार्थ्यांचा.
सहज आठवला म्हणून एक किस्सा सांगतो. गेल्या वर्षी जळगावात एका परीक्षाकेंद्रात एका विद्यार्थिनीने एका (कडक) सुपरव्हायरझला उठून, हात जोडून सांगितलं होतं. ‘सर’ प्लीज जो गोंधळ तुम्हाला कॉपी वगैरे देत करायचाय तो जरा शांततेत करा. अन्यथा मला लेखी तक्रार द्यावी लागेल. जो भाग तुम्हाला खूप जड जाईल. असो, तर आज शाळाशाळांमध्ये अभ्यास कसा करायचा, कसा केला जातो इथपासून परीक्षेचे टेन्शन, कॉपीमुक्त परीक्षा, यश अपयशाला कसं सामोरं जायचं अशा अनेक विषयांवर विद्यार्थ्यांवर पालकांचे प्रबोधन व्हायला हवेत.
अजून एक महत्वाचा मुद्दा. परीक्षाकेंद्रांवर ‘पोलीस’ बंदोबस्त कशासाठी हवा हो? एका पाहणीतून हे चित्र स्पष्ट झालेय, की जे पोलिसादादा प्रश्नपत्रिकांसह केंद्रावर (अहोरात्र?) नजर ठेवून असतात तेच (कमाईसाठी) कॉपीसाठी, प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी रितसर मदत करतात. दुसरी गोष्ट जी भरारी पथकं नेमकी जातात त्यात खरंचं कर्तव्यदक्ष अधिकारी असतात? परवा नेमका हाच प्रश्न भरारीपथकातील एकाला विचारला तेव्हा तो हसत म्हणाला, ड्यटी लावलीये म्हणून हे काम करतोय. कुणाला इंटरेस्ट आहे हो या ड्युटीत?
एक गमतीशीर भाग म्हणजे ’तक्रार येईल तिथे कडक कारवाई करु’ असं जेव्हा शिक्षणाधिकारी प्रतिक्रिया देतात. तेव्हा मला खरंच हसू येत कारण कोणत्याही माध्यमाच्या शाळेचा, परीक्षाकेंद्राचा आपलं ‘निकाल’उत्तम, 100% नकोय हो! कोण तक्रार करणार हो? तुम्हारी भी जयजय, हमारी भी जयजय! ना तुम हारे ना हम हारे! अशी सारी (छानशी) परिस्थिती आहे. शेवटचा पण महत्वाचा मुद्दा. पोलीस, शिक्षक परीक्षाकेंद्रावरील अधिकारीवर्ग यांच्या इतकांच दोषी वर्ग आहे तो पालकवर्ग. तोही मुलांसाठी जेव्हा सारे प्रयत्न (बाहेरुन पण शिस्तशीरपणे) करतो तेव्हा सारेचं प्रश्न संपतात हो आणि मग म्हणावंसं वाटतं. ‘कॉपीने कुठे नेऊन ठेवलाय परीक्षेचा दर्जा!
चन्द्रकान्त भंडारी – 9890476538