मुंबई : कॉफी विथ करणच्या एका एपिसोडमध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने भारतीय क्रिकेट संघातील दोन महत्त्वाचे खेळाडू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल चांगलेच अडचणीत आले होते, अद्यापही त्यांच्या मागील अडचणी कमी होत नसल्याचे चित्र आहे. या प्रकरणाची चौकशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नियुक्त केलेले लोकपाल करत आहेत आणि मंगळवारी पांड्याने लोकपाल डी.के.जैन यांच्यासमोर हजेरी लावताना आपली बाजू मांडली. लोकेश राहुल आज बुधवारी जैन यांच्याकडे आपली बाजू मांडणार आहे.
पांड्या आणि राहुल यांची बाजू ऐकल्यानंतर लोकपालांना या प्रकरणाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकिय समितीसमोर मांडायचा आहे. हा अहवाल वर्ल्ड कप संघ जाहीर होण्यापूर्वी मांडावा लागणार आहे. ”अहवाल सादर करण्यासाठी वेळेचे बंधन नाही, परंतु वर्ल्ड कप संघ जाहीर होण्यापूर्वी तो सादर झाल्यास बरे होईल. या दोघांना केलेल्या गुन्ह्यापेक्षा अधिक शिक्षा मिळणार नाही. लोकपाल काय अहवाल देतात, त्यावर सर्व अवलंबून आहे,” असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
इंडियन प्रीमिअर लीगमधील मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू सततच्या सामन्यामुळे व्यग्र आहे, तर राहुल हा किंग्स इलेव्हन पंजाबचा सदस्य आहे. कॉफी विथ करण प्रकरणानंतर पांड्या व राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यामुळे या दोघांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलावण्यात आले होते. पण, कालांतराने त्यांच्यावरील बंदी उठवण्यात आली आणि त्यांनी राष्ट्रीय संघात कमबॅक केले. या प्रकरणाची पुढील चौकशी लोकपाल करत आहेत.