अभ्यासाचे तास ठरवून मिळवले एमएचटी-सीईटी परीक्षेत यश
भुसावळ- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा ऑनलाइन निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात भुसावळ शहरातील के.नारखेडे विद्यालयाचा विद्यार्थी कुणाल सुभाष चौधरी हा 99.99 पर्सेंटाइल गुण मिळवत जिल्ह्यातून प्रथम आला. त्याला गणितात पैकीच्या पैकी गुण मिळाले. कुठलीही खाजगी शिकवणी न लावता दिवसभरात अभ्यासाचे सहा तास ठरवून अभ्यास केला शिवाय शाळेतील शिक्षकवृंदांसह आई-वडिलांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले, असे कुणालन ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले. कॉम्प्युटर इंजिनिअर होण्याचा मानस त्याने व्यक्त केला.
बारावीतही आला प्रथम
के.नारखेडे विद्यालयातील विद्यार्थी असलेला कुणाल बारावी परीक्षेतही शाळेत 91.54 टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे. कुणालचे वडिल जळगाव विद्यापीठातील रजिष्टार विभागात सहाय्यक म्हणून नोकरीला आहेत तर आई गृहिणी आहे व मोठा भाऊ एम.टेकचे शिक्षण घेत आहे. कुठलीही शिकवणी कुणालने न लावता अभ्यासाचे वेळापत्रक तयार केले व दिवसभरात सहा तास किमान अभ्यास करायचा, असा चंग त्याने करीत सेल्फ स्टडीवर भर दिला आहे. शाळेतील शिक्षकांनी केलेल्या अनमोल मार्गदर्शनासोबतच कुटुंबीयांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे यश मिळवत जिल्ह्यात प्रथम आल्याचे कुणालने सांगितले. दरम्यान, राज्यातून चार लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ती लाख 92 हजार 354 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) विभागातून दोन लाख 76 हजार 166 विद्यार्थ्यांनी तर पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) दोन लाख 81 हजार 154 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.