मुंबई । कॉ. गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखालील पतसंस्थेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नावे 45,51,352 रुपयांची बेहिशोबी रक्कम ठेवलेली आहे. भाकपने या लाखो रुपयांचा कोणताही तपशील निवडणूक आयोगाला दिलेला नाही. त्यामुळे या काळ्या पैशांची सखोल चौकशी शासनाने अंमलबजावणी संचालनालय अन् सीबीआय यांच्याद्वारे करावी. तसेच कॉ. पानसरे, दाभोलकर आणि गौरी लंकेश यांच्या खुनांच्या मागील कारण आर्थिक गैरव्यवहार आणि नक्षलवाद्यांशी संबंध तर नाही ना, या दृष्टीने शासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीव प्रवक्ता रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.
कॉ. गोविंद पानसरे हे कोल्हापुरातील साम्यवाद्यांचे नेते होते. तसेच ते भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या राज्य कार्यकारिणीचे सचिव होते आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यही होते. पानसरे यांच्या नेतृत्वाखाली ‘श्रमिक प्रतिष्ठान’, ‘श्रमिक नागरी सहकारी पतसंस्था’ अशा अनेक संस्था अन् संघटना चालत होत्या. यातील ‘श्रमिक नागरी सहकारी पतसंस्थे’च्या लेखापरिक्षण अहवालांचा अभ्यास केल्याचे शिंदे म्हणाले.
तर वर्ष 2015-16 मध्ये या पतसंस्थेत ‘आयटक’ आणि ‘भारतीय कम्युनिस्ट पार्टी’ अशा दोन साम्यवादी संघटनांच्या ठेवी आहेत. या ठेवी याच वर्षी ठेवलेल्या आहेत, असे नसून त्याआधीपासून त्या ठेवल्या गेलेल्या असाव्यात. सन 2015-2016 मध्ये श्रमिक नागरी पतसंस्थेच्या खाते क्रमांक 10105, 10106, 10107, 10109 ते 10113, 10116 ते 10122, 10124, 10131 या सर्व मिळून सूमारे 45,51,352 रुपयांच्या ठेवी आहेत, ज्यांचा कुठेही उल्लेख करण्यात आला नसल्याचे हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अॅड.संजीव पुनाळेकर म्हणाले.