कॉलरवाली ठरली 26 बछड्यांना जन्म देणारी सुपर मॉम वाघीण

0

भोपाळ । मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात कॉलरवाली या नावाने प्रसिद्ध असलेल्या वाघिणीने 26 बछड्यांना जन्म दिला आहे. फक्त 12 वर्षांची असणारी ही वाघिण सुपर मॉम ठरली असून आतापर्यंत तिने 26 बछड्यांना जन्म दिला आहे. कॉलरवाली ही वाघण सातव्यांदा आई झाली असून तिने चार पिल्लांना जन्म दिला आहे. वन्यजीव तज्ञांनी ही चांगली बातमी असल्याचे सांगितलं आहे. गेल्या काही महिन्यात मध्य प्रदेशात 35 वाघांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही दिलासा देणारी बातमी आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक शुभरंजन सेन यांनी सांगितले आहे की, टी-15 (कॉलरवाली वाघिणीचा कोड) ने नुकताच चार पिल्लांना जन्म दिला आहे. या बछड्यांचे वय सध्या तीन महिन्याच्या आसपास आहे. गस्त घालत असताना वाघिणीला बछड्यांसोबत पाहण्यात आले. पिल्लांना जन्म दिल्यानंतर वाघ आणि वाघिण त्यांना दोन ते तीन महिने गुहेतच लपवून ठेवते. सातव्यांदा आई होणारी आणि इतक्या पिल्लांना जन्म देणारी कॉलरवाली पहिलीच वाघिण असल्याचा अंदाज शुभरंजन सेन यांनी व्यक्त केला आहे.

कॉलरवाली वाघिणीचे बछडे
कॉलरवाली वाघिणीने सर्वात आधी सन 2008 मध्ये तीन बछड्यांना जन्म दिला होता. मात्र 24 दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबर 2008 मध्ये तिने चार बछड्यांना जन्म दिला, ज्यामधील तीन वाघ होते. 2008 ते 2013 दरम्यान कॉलरवाली वाघिणीने एकूण 18 बछड्यांना जन्म दिला, ज्यामधील 14 जिवंत राहिले. सन 2015 मध्ये तिने अजून चार बछड्यांना जन्म दिला. पेंचमध्ये सध्या 50 वाघ आहेत.