कॉलिन मुनरोची याची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर

0

ख्राईस्टचर्च । आयसीसी क्रमवारीत टी-20 क्रिकेटचा नंबर वन फलंदाज कॉलिन मुनरो याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. न्यूझीलंडचा हा स्टार बॅट्समन आता केवळ टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेट सामने खेळणार आहे. क्रिकेटच्या लहान प्रारुपामध्ये कॉलिन मुनरो याला सर्वात चांगला खेळाडू मानले जाते. यामुळेच टी-20 क्रिकेटमध्ये आयसीसी क्रमवारीमध्ये त्याने अव्वल क्रमांक गाठला आहे. मात्र, आता वयाच्या 30 व्या वर्षीच त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मुनरोने आपली शेवटचा कसोटी सामना 2013 मध्ये न्यूझीलंडमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. कॉलिन मुनरोचं आगामी लक्ष्य टी-20 विश्‍वचषक स्पर्धा खेळणे असून त्यासाठी त्याने तयारी सुरु केली आहे. मुनरोने टी-20 क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसोबत खेळण्यात आलेल्या टी-20 तिरंगी मालिके दरम्यानही मुनरोने धडाकेबाज बॅटिंग केली.

कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असली तरी मुनरो टी-20, एकदिवसीय, ब्लॅकॅप्स आणि ऑकलँड अ‍ॅशेजसाठी खेळत राहणार असल्याचे जाहीर केले आहे. कॉलिन मुनरोने टी-20 क्रिकेटमध्ये एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. लहान प्रारुपामध्ये 20 पेक्षा कमी चेंडुंमध्ये तीन अर्धशतकी खेळी करणारा तो एकमेव खेळाडू बनला आहे. मुनरोने टी-20 क्रिकेटमध्ये 20 पेक्षा कमी चेंडूंमध्ये 3 अर्धशतके पूर्ण केली आहेत.