कॉ. गोविंद पानसरेंची हत्या चौघांनी केली

0

कोल्हापूर । ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणाने आता महत्त्वपूर्ण कलाटणी घेतली आहे. कॉ. पानसरे यांच्या हत्येत दोघाजणांचा नाही तर चौघांचा सहभाग होता, असा दावा विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी आज (शुक्रवारी) केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या जामीनावर आज (शनिवारी) निर्णय होणार आहे.

… तर समीरही फरार होईल!
कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी आज कोल्हापूरच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. समीर गायकवाडच्या वकिलांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून याप्रकरणाची स्वतंत्र सुनावणी सुरू आहे. गायकवाडच्या जामीन अर्जावर आज युक्तिवाद झाला. समीर गायकवाडला जामीन दिला तर तो इतर सनातन संस्थेच्या आरोपींसारखा फरार होण्याची शक्यता असल्याने त्याला जमीन देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील निंबाळकर यांनी केला आहे. गंभीर गुन्ह्याचे आरोप असलेले सनातन साधक फरार असल्याचा दाखला त्यांनी यावेळी दिला. तसेच या प्रकरणात पुरवणी आरोपपत्रात यापूर्वीच नमूद केल्याप्रमाणे पानसरे यांच्या खुनावेळी घटनास्थळी 4 लोक उपस्थित असल्याचा पुनरुच्चार निंबाळकर यांनी केला.

रिव्हॉल्वरमध्ये साम्य
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या रिव्हॉल्वरमध्ये साम्य असल्याचा उल्लेख विशेष सरकारी वकील निबांळकर यांनी केला आहे. कॉ. पानसरेंच्या हत्येमध्ये वापरलेल्या 2 रिव्हॉल्वरपैकी एक रिव्हॉल्वर डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येत, तर दुसरे रिव्हॉल्वर प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येत वापरल्याचा दावा दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रामध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान, कॉ. पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर कोल्हापूरमध्ये त्यांच्या राहत्या घराजवळच 16 फेब्रुवारी 2015 रोजी मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. हल्ल्याच्या चार दिवसानंतर पानसरे यांचे मुंबईत उपचारादरम्यान निधन झाले होते. याप्रकरणात समीर गायकवाडसह वीरेंद्र तावडे यालादेखील पोलिसांनी अटक केली होती.