इंडिका व फोर्ड आयकॉन गाड्यांचे नुकसान
कोंढवा – येथील शिवनेरीनगरमध्ये अचानक आग लागून दोन कार भस्मसात झाल्या आहेत. गाडीत कोणीही नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलीस व अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.
कोंढवा परिसरातील शिवनेरीनगर येथे साईबाबा मंदिराजवळील रमा अव्हेन्यू सोसायटी समोरील मोकळ्या मैदानात इंडिका व फोर्ड आयकॉन शेजारी-शेजारी लावल्या होत्या. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोन्ही गाड्यांना अचानक आग लागली. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत दोन्ही कार आगीत भस्मसात झाल्या होत्या. कोंढवा पोलीस कार कोणाच्या आहेत; तसेच कारला आग कशी लागली याचा तपास करीत आहेत.