कोंढव्यातील दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती नियुक्त: चंद्रकांत पाटील

0

मुंबई: पुण्यातील कोंढवा येथील संरक्षक भिंत कोंसळून झालेल्या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान या दुर्घटनेच्या चौकशी करण्यासाठी सहा जणांची चौकशी समिती नेमली असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सोमवारी विधानसभेत दिली. या चौकशी समितीत अतिरिक्त जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त कार्यालयातील प्रतिनिधी, पोलीस आयुक्तांचा प्रतिनिधी, पुणे महापालिकेचा अधिकारी, सहाय्यक संचालक नगररचना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

आर्थिक मदत
दुर्घटनेत मृत्यू झालेले सर्व कामगार हे बिहारच्या कटीहार जिल्ह्यातील आहेत. त्यांचे मृतदेह रविवारी त्यांच्या गावी पाठवण्यात आले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना एनडीआरएफकडून 4 लाख रुपये, तर बांधकाम अपघात विम्याची 5 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्याबाबत आपण लवकर निर्णय घेऊ, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पुण्यातील कोंढवा दुर्घटनेप्रकणी विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. या दुर्घटनेप्रकरणी 11 जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकल्पातील स्ट्रक्चरल डिझायनर, अभियंता आणि वास्तुविशारदाचे परवाना रद्द करण्यात आले आहेत आणि काळ्या यादीत टाकण्यात आल्याची माहितीही चंद्रकात पाटील यांनी विधानसभेत दिली. आर. सी. सी. कन्स्लटंटची नोंदणी स्थगिती करण्यात आली आहे. पडलेली संरक्षक भिंत नव्याने बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.