मुंबई : कोणत्याही समाजाची यशस्वितेकडे वाटचाल नेण्यासाठी आजच्या युवा पिढीची भूमिका फार महत्त्वाची आहे. याच युवा पिढीला प्रोत्साहित करण्यासाठी भोगलेवाडी ग्रामस्थ मंडळ, मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्रात सर्व दूर पसरलेल्या भोगले मराठा समाजातील दहावी, बारावी तसेच वेगवेगळ्या शाखेत पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन नुकतेच सायन येथील सायन भगिनी समाजसेवा संघ हॉल येथे करण्यात आले होते. सध्या झी टीव्ही वर सुरु असलेल्या गाव गाता गजाली या मालिकेचे मूळ लेखक प्रभाकर भोगले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला होता. 10 वी, 12 वी व पदवीनंतर भारतात व परदेशात असलेल्या विविध शैक्षणिक संधी यावर प्रसिद्ध समुपदेशक डॉ. प्रदीप आठवले यांचे व्याख्यान ठेवले होते.
यावेळी बोलताना डॉ. प्रदीप आठवले म्हणाले, सध्या दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत कोकण पॅटर्न सुरु आहे परंतु चांगले मार्क्स मिळूनही करियर घडविण्यासाठी कोकणातील मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. विदर्भ,मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणातले फारच कमी विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्यासाठी जातात. याला कारण दहावीचा निकाल लागेपर्यंत बहुतेक पालक निर्धास्त असतात. पुढे काय करणार? असं विचारल्यावर किती मार्क्स मिळतात त्यावर ठरवू असं उत्तर देतात व हे फार चुकीचे आहे. आठवी -नववीमध्ये मुलांचा अभ्यासाचा कल बघून तो भविष्यात काय योग्य करेल याचा पालकांनी अंदाज बांधला पाहिजे जेणेकरून त्या मुलांना आपले आवडीचे क्षेत्र निवडता येईल.