कल्याण (श्रृती नानल) – काही वर्षांपासून शेजारच्या कर्नाटक राज्यातील आंब्याने मुंबईच्या फळबाजारात शिरकाव केल्यानंतर आता केरळ व तामिळनाडू येथील आंब्यानेही बाजारात अतिक्रमण केल्याचे दिसून आले आहे. मात्र कोकणातील हापूस आंबा ओळखण्यासाठी आवश्यक ज्ञान नसल्याने त्याचा गैरफायदा व्यापारी घेत आहेत. आणि नेहमीप्रमाणे यंदाच्या वर्षीही बाजारात कोकणाच्या हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूतील आंब्याची सर्रास विक्री होऊ लागली आहे.
पहिल्यांदाच मुंबईत पाठविण्यात आलेला तामिळनाडूच्या पूर्व भागातील आंबा आणि कोकणातील हापूस आंबा यांची चव आणि आकार यांच्यात काही प्रमाणात साम्य असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी कोकणातील हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची फसणूक सुरू असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या महिन्यात कोकणातील हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात आल्यानंतर पुन्हा कोकणातील हापूस आंब्याची आवक झाली नाही. 15 जानेवारीनंतर कोकणातील हापूस आंब्याची थोडीफार आवक सुरू झाली आहे, मात्र ही आवक सुरू होण्याअगोदरच कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या दाक्षिण भारतातील आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. तामिळनाडूतील आंब्याने मुंबईतील बाजारपेठ काबीज करण्यासाठी पहिल्यांदाच पाऊल ठेवले आहे. विशेष म्हणजे हा आंबा कोकणातील देवगड भागात पिकणार्या हापूस आंब्यासारखाच असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या 400 ते 500 डझन तामिळनाडूचे आंबे कल्याण-डोंबिवली येथील घाऊक फळबाजारात दाखल होत आहेत.
या आंब्यांची आवक सध्या मर्यादित असल्याने ते 900 ते 1200 प्रति डझन किमतीत विकले जात आहेत. आता 15 दिवसांनी बाजारात येणार्या कोकणातील हापूस आंब्याला कर्नाटक, तामीळनाडूच्या आंब्याला टक्कर द्यावी लागणार आहे.
असा ओळखा कोकण व कर्नाटकी आंब्यातील फरक
रत्नागिरी हापूस आणि कर्नाटकचा आंबा हे साधारण सारखेच दिसत असल्यामुळे त्यातला फरक ओळखणे कठीण आहे. त्यामुळे त्यांचे ब्रॅण्डिंग करणे गरजेचे आहे. रत्नागिरी हापूस आणि कर्नाटक आंबा यांचे जिओग्राफिकल इंडिकेशन (जीआय) झाले पाहिजे, असे संदीप वैद्य यांनी सांगितले. तर दरवर्षी किमान 25 हजार हापूसची कलमे कर्नाटकातील ग्रामीण भागात रवाना होतात. या कलमांवर संकरित जातीची प्रक्रिया केली जाते. मूळ कोकणचा हापूस चवीला अत्यंत गोड आणि केशरी रंगाचा असतो. पातळ सालीच्या या आंब्याच्या देठाजवळ खड्डा असतो. तर कर्नाटकातील हापूस कापल्यावर पिवळसर जाड सालीचा निमुळता निघतो. सध्या कर्नाटकच्या या हापूसने बाजारपेठ काबीज केली असून, कोकणातील हापूसच्या नावाने हा बनावट आंबा फेरीवाल्यांकडून ग्राहकांच्या गळी उतरवला जात आहे. मात्र ग्राहकांनी या आंब्यांतील फरक ओळखूनच हापूसची खरेदी करावी, असा सल्ला घाऊक बाजारपेठेतील व्यापारी देत आहेत.