मुंबई :– राज्यभरात गणेशोत्सवाची लगभग सुरू झाली आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी जात असतात. या नागरिकांना जाण्या-येण्याची सुविधा व्हावी यासाठी परिवहन विभागाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. 25 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. मुंबई व उपनगरातील नागरिकांना कोकणात गणपतीसाठी जाण्यास सुविधा व्हावी यासाठी परिवहन विभागाकडून कोकणात गणेशोत्सवासाठी 2,116 जादा एसटी बसेस सोडल्या जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जनशक्तिशी बोलताना दिली. ह्या जादा गाड्यांची जाण्याची बुकिंग 15 तारखेपासूनच सुरू केली आहे तर ऑनलाईन बुकिंग 22 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती रावते यांनी दिली. यासाठी मराठवाडा व इतर ठिकाणाहून अधिक गाड्या मागविल्या असल्याचे रावते यांनी सांगितले.
रेल्वेचीही अतिरिक्त मदत
यंदा गणेशोत्सवासाठी रेल्वेकडून देखील गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या सोडल्या जाणार असल्याचे रावते यांनी सांगितले. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 200 च्या वर अधिकच्या रेल्वे फेऱ्या दिल्या आहेत, असे रावते म्हणाले. मात्र प्रवाशांचा अधिक भर हा एसटीने प्रवास करण्यावर असल्याने एसटीची उपलब्धता वाढविली आहे. एसटी ही गावापर्यंत जात असल्याने चाकरमानी एसटीला प्राधान्य देत आहेत, त्यामुळे त्यांची काळजी घेणे परिवहन विभागाचे कर्तव्य असल्याचे रावते म्हणाले.
खड्ड्यांचा विषय मार्गी लावणार
गणेशोत्सव काळात ह्या मार्गांची दुरवस्था झालेली असते. ह्या खड्ड्यांच्या बाबत बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलणे झाले असून खड्डयांची दुरुस्ती गणपतीच्या आधी करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी कॉन्ट्रॅक्टर बदलणार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. तसेच या मार्गांवरून अवजड वाहने गणपतीच्या आधीचे तीन दिवस जाऊ देणार नाही असेही तर म्हणाले. अवजड वाहनांसाठी दुसरी व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच अवैध वाहतुकीवर अंकुश आणणार असल्याचे देखील ते म्हणाले.
कोकणात गणेशोत्सव हा अतिशय महत्वाचा उत्सव आहे. यासाठी मुंबई व उपनगरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक कोकणात जातात. यासाठी सरकारकडून अधिकच्या बसेस सोडण्यात येणार आहेत. नागरिकांनी या दरम्यान खाजगी वाहतूक टाळावी आणि एसटी वापरावी.
– दिवाकर रावते, परिवहन मंत्री