अलिबाग । गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणार्या चाकरमान्यांचा रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्ग हद्दीत प्रवास सुखकर आणि विनाव्यत्यय व्हावा, यासाठी राज्य सरकारसह, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी वर्दळीच्या वेळेत गृह विभागाने मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी केली आहे. जिल्हा पोलीस महामार्गावर चोख बंदोबस्त नेमण्याचे नियोजन सुरु आहे. तसेच महामार्गावर क्रेन, रुग्णवाहिका, मॅकॅनिकल तैनात करण्यात आले आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाच्या या प्रयत्नांना महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचे विघ्न भेडसावणार आहे.
चोख पोलीस बंदोबस्त
मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील भागात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये उपविभागीय अधिकारी, पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस कर्मचार्यांचा समावेश असणार आहे. यासह होमगार्ड, राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल, महगामार्ग पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. महामार्गावर तैनात असलेल्या पोलीसांना गस्तीसाठी जीप व मोटारसायकल उपलब्ध करुन देण्याचे नियोजन सुरु आहे. तसेच पोलीसांना एकमेकांसोबत तसेच नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधण्यासाठी बिनतारी संच व वॉकी टॉकी देण्यात येणार आहेत.
एसटी, रेल्वेच्या जादा फेर्या
कोकणात जाणार्या चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी एस.टी. महामंडळ व कोकण रेल्वे प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. नियमित बस फेर्यांऐवजी 2 हजार 216 फेर्या अधिक चालविल्या जाणार आहेत. मुंबई सेंट्रल, बोरिवली, दादर, कुर्ला, परेल, पालघर, ठाणे येथून या गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्या रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील अनेक गावांपर्यंत असतील. 20 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान या गाड्या सोडण्यात येतील. या व्यतिरिक्त तसेच कोकण रेल्वेमार्गावर रेल्वेच्या 200 हून अधिक जादा
फेर्या होणार आहेत.