मुंबई | गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या लोकांनी मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन गृहराज्यमंत्री तथा सिंधुदूर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईहून चार ते पाच लाख लोक कोकणात जातात. मुंबई-गोवा महामार्गावरील बहुतांश खड्डे भरण्यात आले असले तरी वाहनांची गर्दी लक्षात घेता तेथे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी लोकांनी सातारा-कराड-चिपळूण, कोल्हापूर-कराड-महाड, कोल्हापूर-गगनबावडा-कणकवली, कोल्हापूर-राधानगरी-कणकवली किंवा कोल्हापूर-अंबोली-सावंतवाडी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. या काळात पोलीसठाण्यात, वाहतूक पोलीस चौक्यांवर देण्यात येणारे पास घेणाऱ्या भाविकांकडून टोलही आकारला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
या संपूर्ण मार्गांवर अतिवृष्टीमुळे निर्माण होणारी परिस्थिती, आरोग्यविषयक मदत उपलब्ध करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत समन्वयासाठी काही विशिष्ट अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गरज भासल्यास जनतेने मुंबईत पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर (९८६७७९८७९६) किंवा अशोक दुधे (९८७०५६२००१), ठाण्यात पोलीस निरीक्षक अभय कुरूंदकर (९८२३८७२३४५), रायगडमध्ये संजय पाटील (९८८००४९९६६), रत्नागिरीत नितेश गट्टे (९०४९९२१०७५) आणि सिंधुदूर्गात अतिरिक्त पोलीस अधीक्षक गायकवाड (९८२३९४३१२३) यांच्याशी संपर्क साधावा, असेही केसरकर यांनी सांगितले.