मुंबई-मुंबई, ठाणे आणि कोकणात येत्या २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात दक्षिण कोकण, गोवा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून धडकला मात्र मान्सूनच्या पावसात खंड पडल्याने राज्यभरात पेरणीही रखडली होती. मात्र पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे.
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. रविवारी पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाच्या मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. मुंबई आणि उपनगरांप्रमाणेच कोकणातही पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, रविवार आणि सोमवार मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.