अलिबाग । विदर्भातील तरुणांनी कोकणात एकत्र येऊन स्वच्छतेचा संदेश दिला. या तरुणांनी मांडवा आणि किहिम येथे स्वच्छता मोहीम राबविली आणि जलसंधारणासाठी 21 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला. कोकण किनारपट्टीला लाखो पर्यटक दरवर्षी भेट देतात. पर्यटक खाद्यपदार्थांची पाकिटे, प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोलची ताट यासारख्या वस्तू मागे सोडून जातात. यामुळे स्थानिक ग्रामपंचायती आणि नगरपालिकांवर स्वच्छता राखण्यासाठी अतिरिक्त ताण पडतो. हि बाब लक्षात घेऊन विदर्भातील नागपूर येथून आलेल्या युवकांनी अलिबाग तालुक्यातील मांडवा आणि किहीम येथे स्वच्छता मोहीम राबवून आदर्श घालून दिला.
नागपूर येथील धरमपेठ हायस्कूलचे वीस माजी विद्यार्थी या मोहीमेत सहभागी झाले. त्यांनी रविवारी सकाळी मांडवा आणि किहीम येथे स्वच्छता मोहीम राबविली. फ्रेन्ड्स जॉय आफ टुगेदरनेस या ग्रुपच्या माध्यमातून हि मोहीम राबविण्यात आली.तसेच जलसंधारणाच्या कामासाठी 21 हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सुपूर्द केला. मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडी राजेश नार्वेकर यांनी हा निधी स्वीकारला. कोकणात येणार्या पर्यटकांनी येथील किनारे स्वच्छ राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.