कोकणात रिफायनरी उभारण्याआधीच जमिनींची भाजप दलालांकडून खरेदी!

0
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा खळबळजनक आरोप; सेनेकडून विरोध वाढला 
मुंबई   : राजापूर नाणार परिसरात होऊ घातलेल्या जगातील सर्वात मोठ्या रिफायनरीचा गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही. या प्रकल्पाला शिवसेनेकडून जोरदार विरोध कायम असून कालच कोकणातील रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, प्रसंगी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन रस्त्यावर उतरेन अशी भूमिका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी घेतल्यानंतर मंगळवारी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केले आहेत. सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेल्या या रिफायनरीच्या परिसरातील जमिनी मार्चपासून खरेदी करण्यास सुरुवात झाली होती आणि ही खरेदी दिल्ली तसेच गुजरातमधील भाजपच्या दलालांनी केली आहे, असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला आहे. जमिनी खरेदी झाल्याचे सातबाराही समोर आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या मार्चपासून जमीन खरेदी सुरू
 नाणार येथे प्रकल्प येणार हे दिल्लीतील राज्यकर्त्यांना आधीच ठाऊक होते. यामुळेच भाजपच्या दलालांनी मोठ्या प्रमाणात आणि क्षुल्लक किंमतीत जमिनी खरेदी केल्या. गेल्या मार्चपासून ही जमीन खरेदी सुरू झाली होती. त्या दरम्यान राजापूर शहरातील हॉटेल्स जमीन दलालांनी मोठ्या संख्यने भरली होती आणि त्यात दिल्ली, गुजरातमधील दलाल अधिक होते.   सध्या या परिसरात जमीन खरेदीचे मोठे व्यवहार होत असून यामागे मुख्यमंत्री व रत्नागिरीचे कलेक्टर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने हे चालले आहे. या विरोधात न्यायालयात जाऊ. वेळ पडल्यास सुप्रीम कोर्टात जायला मागे पुढे पाहणार नाही, असे राऊत म्हणाले.जैतापूरमध्ये नारायण राणे यांचे दलाल जमीन खरेदी विक्री करण्यात पुढे होते. आता रिफायनरीतील जमीन हडपण्यात भाजपचे दलाल पुढे आहेत, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले.
मुख्यमंत्री खोटारडे, शिवसेनेकडून असहमती पत्रांची मोहिम
खासदार राऊत यांनी रिफायनरी आणण्यासाठी पुढाकार घेतला, असा खोटाररडेपणा मुख्यमंत्र्यांनी केला. हे मी उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातले. यावर त्यांनी फडणवीस यांना विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, मी बोललो पण ते छापण्यासाठी नव्हते.  रिफायनरी प्रकल्प नको म्हणून कोकण परिसरातील लोकांकडून असहमती पत्र भरून घेण्याची मोहीम शिवसेनेतर्फे राबवली जाणार आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली.  जैतापूर येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी कंपाऊंडच्या आत कोणतेही बांधकाम सुरु नसून येथे तयार होणारी महागडी वीज कोणीही घ्यायला तयार होणार नाही.अरेवासारखी कंपनी याआधीच पळून गेली असे राऊत म्हणाले.