कोकण मंडळाची पुढच्या वर्षी ५ हजार घरांची सोडत

0

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १ हजार ३८४ घरांसाठी रविवार मोठ्या उत्साहात सोडत पार पडली. या सोडतीसाठी १ लाख ६४ हजार अर्ज आले होते. या सोडतीत घर लागले नसल्याने निराश झालेल्या अर्जदारांसाठी एक चांगली बातमी आहे. आपलं नशिब पुन्हा आजमावण्याची संधी अर्जदारांना मिळणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाद्वारे पुढच्या वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात तब्बल ५ हजार घरांची सोडत काढण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सांगितले.

वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात रविवारी सकाळी म्हाडाची सोडत पार पडली. यावेळी म्हाडा अध्यक्ष उदय सामंत, उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह म्हाडा पदाधिकारी उपस्थित होते. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात ५ हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जाहिरात काढण्याच्या नियोजनालाही सुरूवात झाली असल्याचे प्रकाश मेहतांनी यावेळी सांगितले. विविध उत्पन्न गटासाठीची ही घरे विरार, वेंगुर्ला, ठाणे, कल्याण या विभागात असतील. घरांच्या किंमती अद्याप निश्चित करण्यात आल्या नाहीत असंही  मेहता यांनी सांगितले.