मुंबई। मुंबईतून कोकणात जाणार्यांची मोठी संख्या पाहता गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी आणि कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे सोडण्यात आल्या आहे. यात जादा 1हजार 500 एसटी गाडयांचा समावेश आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईतील चाकरमान्यांची गावी जाण्याची गर्दी लक्षात घेता यावेळी जादा गाडया सोडण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या गाड्यांची बुकींग दोन महिने आधीच फूल्ल होत असल्यामुळे चाकरमान्यांना एसटीचा आधार वाटतो. त्यामुळे मुंबईहून येण्यासाठी 1हजार 500 जादा एसटी सज्ज आहेत.
महामार्गावर गस्तीपथके तैनात
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर सुरक्षतेची काळजी घेण्यात आली आहे. अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून कशेडी ते संगमेश्वर आणि संगमेश्वर ते कशेडी अशी दोन गस्तीपथके तैनात ठेवण्यात येणार आहेत. तसेच जादा गाडयांचा बिघाड होण्याची भीती असल्यामुळे फिरते दुरुस्तीपथकही या मार्गावर कार्यरत राहणार आहे.
22 ऑगस्टपासून धावणार गाड्या
गतवर्षी 1 हजार 350 गाडया फूल्ल झाल्या होत्या. त्यामुळे यंदा 1 हजार 500 गाडयांचे नियोजन करण्यात आले आहे. एसटीच्या जादा गाडया मुंबईहून 22 तारखेपासून धावणार आहेत. 22 ते 24 या काळात जादा गाडया असतील. यात शिवशाहीचाही समावेश आहे. गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांसाठी ऑनलाईन आणि ग्रुप बुकींगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. 50 प्रवाशांचे बुकींग झाल्यास एसटी त्यांना गाडी उपलब्ध करुन देणार आहे. कोकण रेल्वेमार्गावरही मोठया प्रमाणात जादा गाडया सोडण्यात आल्या आहेत.