कोची मेट्रो रेल्वेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

0

कोची। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी केरळमधील पहिल्या मेट्रो रेल्वेचे उद्घाटन केले. या प्रसंगी मेट्रोमॅन ई.श्रीधरन, केंद्रीय शहरी विकास मंत्री वेंकय्या नायडू, केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम, मुख्यमंत्री पिनरायी विजयन, केरळ विधानसभेचे विरोधी पक्ष नेते रमेश चेन्नीथला उपस्थित होते. हा समारंभ जवाहरलाल स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान मोदींनी उद्घाटनानंतर कोची मेट्रो रेल्वेने प्रवासही केला. देशातील पहिल्या एकीकृत मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट प्रणालीचा दावा करणार्‍या या मेट्रोमुळे प्रादेशिक संपर्कात सुधारणा होणार आहे. या सेवेमुळे कोचीतील वाहतुकीची कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.अलुवा ते पलारीवत्तोम या 2 स्थानकांदरम्यान ही मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. मेट्रो सेवेचा पहिला टप्पा असलेला हा मार्ग एकूण 13 किलोमीटरचा आहे. नतंर या मार्गाचा विस्तार 27 किमीपर्यंत केला जाणार आहे. कोची मेट्रोचे काम वर्ष 2013 मध्ये सुरू झाले होते. ई.श्रीधरन यांनी या मेट्रो प्रकल्पाच्या योजनेचे सल्लागार म्हणून काम पाहिले होते.

ट्रांसजेडर लोकांची नियुक्ती
कोची मेट्रो ही देशाची पहिली मेट्रो असणार आहे जेथे ट्रान्सजेंडर लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली कोची मेट्रो ही आणखी एका गोष्टीमुळे विशेष ठरणार आहे. कोची मेट्रोमुळे 1000 महिला आणि 23 ट्रान्सजेंडरना रोजगार मिळणार आहे. केरळ सरकारने ट्रान्सजेंडरांसोबत होणारा सामाजिक भेदभाव दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला होता. केरळ सरकारच्या कुडुम्बश्री योजनेतंर्गत कोची मेट्रोत 23 ट्रान्सजेंडरांना कामावर ठेवण्यात आले आहे. या सगळ्यांची विविध पदांवर भरती करण्यात आली असून सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. त्यानंतर या ट्रान्सजेंडरांना टिकिटिंग, सफाई आणि हाऊस किपिंगसंदर्भातील कामांसाठी नियुक्त केले जाईल.

पुष्पगुच्छाऐवजी पुस्तक द्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोची येथे वाचन दिवस कार्यक्रमाचे उद्घाटन केले. मोदी लोकांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात. तसेच अशा सामाजिक चळवळीत त्यांना मोठी आशा दिसते. या माध्यमातून चांगला समाज आणि राष्ट्र निर्माण करण्याची क्षमता आपल्यात आहे, असे त्यांनी यावेळी म्हणाले.सेंट टेरेसा महाविद्यालयातील पी. एन. पनीकर राष्ट्रीय वाचन दिवस कार्यक्रमाच्या सप्ताहचे उद्घाटन त्यांनी केले. केरळमधील नागरिकांची साक्षरता ही केवळ सरकारच्या प्रयत्नशीलतेवर अवलंबून नसून, नागरिक आणि राज्यातील प्रमुख कार्यक्रमांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परिश्रमामुळे आहे, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात बोलताना केले.ते जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनीदेखील मवेंचफ नावाची एक चळवळ सुरू केली होती, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. शुभेच्छा म्हणून पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तक देण्यासाठी लोकांना त्यांनी यावेळी आवाहन केले आणि हीच मोहीम देशात खूप मोठा बदल घडवून आणू शकते असे ते यावेळी म्हणाले. आता फाउंडेशन डिजिटल साक्षरतेवर लक्ष केंद्रित करीत आहे. त्यामुळे त्यांनी याचे कौतुक केले. डिजिटल साक्षरतेवर लक्ष केंद्रित करणे ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.