नवी दिल्ली । फिरोझशहा कोटला मैदानात नुकत्याच खेळल्या गेलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात खेळापेक्षा जास्त चर्चा झाली ती मैदानावर पसरलेल्या धुराळ वातावरणाची. राजधानीत 2 ते 6 डिसेंबरदरम्यान पार पडलेल्या या सामन्यात लंकेचे क्रिकेटपटू अनेक वेळा तोंडावर मास्क लावून मैदानात उतरले होते. याशिवाय श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल आणि भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने मैदानावरच उलटी केली होती. सामन्यादरम्यान श्रीलंकेच्या खेळाडूंनी वारंवार सामनाधिकार्यांकडे प्रदूषणाबाबत तक्रार केली होती. श्रीलंकेचे व्यवस्थापक असंका गुरुसिन्हा यांनी, तर पुढील सामन्यांसाठी एअर क्वॉलिटी मीटर लावण्याची मागणी केली. या प्रकरणात आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने उडी मारली आहे.
प्रदुषणाचा स्तर 18 टक्क्यांहून जास्त
अमेरिकेच्या दूतावासाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या मानक स्तरांहून दिल्लीतील प्रदूषणाचा स्तर 18 टक्के जास्त होता. आयसीसीच्या चिकित्सक समितीच्या चौकशीनंतर खराब वतावरणामुळे झालेल्या अनारोग्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर कितपत परिणाम होऊ शकतो हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आयसीसीला संलग्न असलेल्या देशांना देशांतर्गत आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान वैद्यकीय योजनांमध्ये बदल करावे लागणार आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार्या आयसीसीच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा कसोटी सामना दिल्लीत खेळवणे योग्य होते का, याची चौकशी चिकित्सकांमार्फत करण्यात येणार आहे.