मुंबई : नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव येथे बनावट सार्वजनिक बांधकाम विभाग वेब मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात माजी मुख्य सचिव किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी मुख्य सचिव किंवा निवृत्त न्यायाधीश यांच्या कसून चौकशी करावी, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले.
डॉ. अपूर्व हिरे यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. जयवंत जाधव, भाई जगताप, हेमंत टकले, सुनील तटकरे आदींनी उपप्रश्न विचारले. खाजगी टॅक्सी सेवाचालकांवर निर्बंध घालण्याच्या संदर्भातल्या धनंजय मुंडे व इतर सदस्यांनी उपस्थित केलेल्या एका तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठी येत्या तीन महिन्यांत इलेक्ट्रॉनिक व्यासपीठ तयार केले जाईल, असे जाहीर केले. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी या वाहनांसाठी नवीन परवाने देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे आदींनी उपप्रश्न विचारले. भाई जगताप यांच्या एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महसूल खात्याच्या जमिनींची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. ही माहिती संकलित झाल्यावर दिसून येणारी अतिक्रमणे दूर करणे सोपे होईल, असे ते म्हणाले.