पिंपरी-चिंचवड : मिळकतकराच्या संपूर्ण वसुलीसाठी महापालिका प्रशासन खटाटोप करीत असले, तरी न्यायालयीन वाद, राज्य शासन आणि इतर शासकीय विभागांसोबत असलेला वाद त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या दिवाळखोरीमुळे कोट्यवधी रुपये कराची वसुली रखडली आहे. या औद्योगिक, मिश्र, मोकळ्या जमीन, बिगरनिवासी मिळकतीच्या थकीत मिळकतकराच्या वसुलीबाबत तातडीने पावले उचलल्यास महापालिकेच्या तिजोरीत ही प्रलंबित थकबाकी जमा होऊ शकते. जकातीपाठोपाठ एलबीटी बंद झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत केवळ मिळकतकर आहे. त्यामुळे या कराची 100 टक्के वसुली होणे अत्यावश्यक आहे; परंतु त्यात महापालिका प्रशासनाला यश मिळत नसल्याचे चित्र आहे.
शहरात साडेचार लाख मिळकती
पिंपरी-चिंचवड शहरात 31 मार्च 2017 च्या नोंदीनुसार एकूण 4 लाख 50 हजार 761 निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र आणि मोकळी जागा अशा मिळकती आहेत. सन 2016-17 या आर्थिक वर्षात एकूण 3 लाख 16 हजार 826 मिळकतधारकांनी एकूण 393 कोटी 53 लाख रुपयांचा मिळकतकर भरणा केला आहे. एकूण 1 लाख 75 हजार 67 जणांनी 137 कोटी 70 लाख रुपये रोखीने, तर 53 हजार 256 जणांनी 154 कोटी 36 लाख रुपये धनादेशाद्वारे जमा झाले. 87 हजार 355 नागरिकांनी ऑनलाईन 85 कोटी 17 लाख रुपयांचा भरणा केला. त्यातील तब्बल 1 लाख 33 हजार 935 मिळकतधारकांनी मुदतीत मिळकतकर भरलेला नाही.
कंपन्यांकडेही कोट्यवधींची थकबाकी
औद्योगिकनगरीतील अनेक कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत. काही कंपन्यांचे स्थलांतर झाले आहे. काही कंपन्या आजारी घोषित केल्या आहेत. त्यामुळे अशा कंपन्यांकडेही महापालिकेची कोट्यवधी रुपयांची मिळकतकराची थकबाकी आहे; तसेच केंद्र सरकारच्या हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक्स (एचए) कंपनीच्या कॉलनी या निवासी मालमत्तेपोटी तब्बल 72 लाख 18 हजार 199 रुपयांची थकबाकी 31 मार्च 2017 पर्यंत आहे. या डबघाईस आलेल्या आजारी कंपनीच्या मिश्र मालमत्तेपोटी एकूण 9 कोटी 32 लाख 54 हजार 823 रुपये आणि मोकळ्या जागेसाठी 6 कोटी 8 लाख 72 हजार 931 रुपये थकबाकी आहे. शहरात 50 लाखांपासून ते 45 कोटी रुपयांची थकबाकी असलेल्या तब्बल 59 मालमत्ता आहेत. त्यापैकी सांगवी येथील जिल्हा रुग्णालयाने 1 कोटी 47 लाख 15 हजार 195 रुपयांची थकबाकी नुकतीच जमा केली आहे. त्याचबरोबर दापोडी येथील नियोजन व संकल्प चित्र विभागाने 50 लाख 62 हजार 54 रुपयांंच्या थकबाकीचा धनादेश जमा केला आहे.
मिळतकधारकांना सामान्यकरात सूट
शहरातील मिळकतधारकांना मिळकराच्या सामान्यकरात 5 ते 100 टक्के सूट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर 30 जून 2017 पर्यंत मिळकतकराचा ऑनलाईन भरणा केल्यास सामान्यकरात 5 टक्के सूट दिली जाणार आहे. तर 31 मार्च 2018 पर्यंत कर भरल्यास सामान्यकरात 2 टक्के सवलत असणार आहे. संरक्षण दलातील शौर्यपदक मिळालेल्या आणि माजी सैनिकांच्या विधवा यांच्या नावे असलेल्या; तसेच संरक्षण दलातील अविवाहित शहीद झालेल्या सैनिकांच्या वारसदारांना मिळकतकराच्या सामान्यकरात 100 टक्के सूट जाहीर केली आहे. शहरातील माजी सैनिक व स्वातंत्र्यसैनिक, त्यांच्या पत्नी यांच्या स्वत: राहत असलेल्या एका निवासी मिळकतीस मिळकतकरातील सामान्यकरात 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. केवळ महिलांच्या नावे असलेल्या आणि स्वत: राहत असलेल्या निवासी घराच्या करातील सामान्यकरात 50 टक्के सवलत देण्यात येते. एकूण 40 टक्के व त्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या अंध, अपंग, कर्णबधिर व मूकबधिर यांच्या नावाने असलेल्या मिळकतीच्या मिळकतकराच्या सामान्यकरात 50 टक्के सूट देण्यात येते. ग्रीन बिल्डिंग रेटिंग सिस्टिम राबविणार्या मिळकतीस कराच्या सामान्यकरात 5 ते 15 टक्के सवलत दिली जाते.
ऑनलाईन भरणा केल्यास खास सवलत
30 जूनपूर्वी थकबाकीसह मिळकतकर बिलाची आगाऊ रक्कम भरल्यास स्वतंत्र नोंद असलेल्या निवासी मिळकतधारकांस कराच्या सामान्यकरात 10 टक्के सूट आहे. बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक आणि मोकळ्या जमिनी आदी मिळकतींच्या कराच्या सामान्यकरात 5 टक्के सूट दिली जाते. मिळकतकराची थकबाकीसह दोन्ही सहामाहीचे संपूर्ण बिलांची रक्कम एकरकमी 30 जूनपूर्वी भरणा करणार्या मिळकतधारकांना सदर दोन्हीपैकी एका योजनेचा लाभ घेता येईल; तसेच डिजीटल व्यवहारांना चालना मिळावी म्हणून 30 जूनअखेर मिळकतकराचा ऑनलाईन भरणा केल्यास चालू वर्षाच्या मागणीतील सामान्यकरात 5 टक्के सवलत (वरील सवलती व्यतिरिक्त) देण्यात येणार आहे. त्यापुढे 31 मार्च 2018 अखेर मिळकतकराचा ऑनलाईन भरणा केल्यास चालू वर्षाच्या मागणीतील सामान्यकरात 2 टक्के सवलत देण्यात असणार आहे.
30 जूनपर्यंत योजनांचा लाभ मिळणार
शहरातील मिळकतधारकांनी 30 जूनपर्यंत मिळकतकराचा भरणा करून सवलत योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे. सध्या 16 करसंकलन विभागीय कार्यालये, महापालिकेची सहा क्षेत्रीय कार्यालयांत रोखीने आणि धनादेशांद्वारे मिळकतकर सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत स्वीकारला जात आहे. तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन बिले अदा करण्याची 24 तासांची सुविधा उपलब्ध आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.