कोट्यवधी रुपयांची शक्तिवर्धक औषधी ‘कुथ वनस्पती’ जप्त

0

नवी दिल्ली। हिमालयात आढळणारी कुथ नावाची संरक्षित वनस्पती अधिकार्‍यांनी जप्त केली आहे. लैंगिक शक्तीवर्धक म्हणून औषधासाठी या वनस्पतीला प्रचंड मागणी आहे. ही वनस्पती चीनमध्ये चोरट्या मार्गाने नेण्यात येत होती.ही वनस्पती 8,000-12000 फूट उंचीवर अत्यंत थंड वातावरणात आढळून येते. या वनस्पतीचा वापर सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदीक तेल, अगरबत्तीमध्ये केला जातो. वन्यजीव गुन्हा नियंत्रण अन्वेषणचे (डब्ल्यूसीसीबी) विभागीय उप संचालक एम मरॅन्को म्हणाले, जवाहरलाल नेहरु बंदरावर या वनस्पतीचे रायगड येथे पहिले पार्सल मार्च महिन्यात मिळाले. दुसर्‍यांदा एप्रिल, तिसर्‍यांदा आता मिळाले आहे.

जम्मु काश्मीर उत्तरखंडात मिळते
सर्व एकत्रित मिळून 33 मेट्रीक टनांची वनस्पती जप्त करण्यात आली आहे. सीमा शुल्क विभागाने डब्ल्यूसीसीबी विभागाला या मालाची माहिती तातडीने कळविली होती. जेव्हा वन्यजीव गुन्हा नियंत्रण अन्वेषणच्या अधिकार्‍यांनी तपासणी केली तेव्हा ही सामान्य औषधी वनस्पती असल्याची शंका आली. मात्र या वनस्पतींचे नमुने सेंट्रल नॅशनल हर्बेरिअम (पश्चिम बंगाल) व नॅशनल बॉटिनिकल रिसर्च इन्सटिट्यूट (लखनौ) या संस्थांना तपासणीसाठी पाठवण्यात आले. यावेळी ही वनस्पती कुथ प्रकारची वनस्पती असल्याचा अहवाल मिळाला.केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ही वनस्पती संरक्षित असून तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कुथ ही नैसर्गिक अधिवास असलेल्या जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, पाकिस्तान व चीनच्या काही भागात आढळून येते.

नामशेष होण्याच्या मार्गावर
कुथ या वनस्पतीचे अस्तित्व हे अत्यंत चिंताजनक झाले असून ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, असे सीआयटीईएस या आंतरराष्ट्रीय संस्थेने म्हटले आहे. यामुळे केवळ प्रमाणित असल्याशिवाय कुथची आयात व निर्यात करण्याला परवानगी नाही. डब्ल्यूसीसीबीचे अधिकारी तित्तोलमा वर्मा म्हणाल्या, की कुथची लागवड आता हिमाचल प्रदेशात अत्यंत कमी जागेत करण्यात आली आहे. परंतु तिचे आयुर्वेदीक महत्व लक्षात घेऊन चीन व तिबेटमध्ये औषध म्हणून सातत्याने मागणी वाढते आहे. त्यामुळे या देशात होणार्‍या तस्करीतही वाढ होत आहे.