कोट्यवधी रूपयांच्या भ्रष्टाचाराची लागवड करणार्या वन अधिकार्याला वरिष्ठांकडून जीवदान
वन मंत्री सुधीर मुंनगंटीवार यांचीही वन प्रशासनाकडून दिशाभूल, ठाणेचा अधिकारी सुधीर मांजरेंवर कारवाई नाहीच
ठाणे : राज्य शासनाच्या वन विभागामार्फत वनसंवर्धनासोबतच ते वाढवण्यासाठी ठाणे येथील टोकावडे दक्षिण रेंज मध्ये मंजुरांकरवी खड्डे खोदण्यापासून ते वृक्ष लागवड करण्यापर्यंत अनेकविध कामे मंजुरांवर केली जातात. त्याचप्रमाणे कर्मचारी निवासस्थानांचे बांधकाम, सभोवतालची कामे, कंपाऊंड बांधकाम, अंतर्गत रस्ते, छोटे मोठे बंधारे अशी कामे या रेंज मध्ये केली जातात. गेल्या तीन वर्षातही कोट्यवधी रूपयांची कामे या वन परिक्षेत्र अधिकार्यांनी कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता करवून घेतली आहेत. विशेषत: मजुरांची खोटी नोंद, सरकारी किंवा खाजगी नोकरीत असलेल्यांची नावे मजुरांच्या यादीत टाकणे, काही नावे खोटी घालून मजुरांच्या नावे लाखो रूपयांचा गैरव्यवहार झाला आहे. बांधकामांचे पैसेही असेच लाटणे सुरू आहे आणि वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रारी करूनही कारवाई होताना दिसत नाही.याचे उदाहरण म्हणजे, ठाणे जिल्ह्यातील वन परिक्षेत्र अधिकारी संजय मांजरे यांच्याविरोधात पुराव्यानिशी अनेक तक्रारी होऊनही कारवाई केली जात नाही. भ्रष्ट अधिकार्यांना वाचवण्यासाठी काही प्रमूख अधिकारी हे वन मंत्र्यांची दिशाभूल तर करत नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे. तत्कालिन, सरकारच्या काळात वन अधिकार्यांनी अशीच दिशाभूल करून कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे.
जंगल मे मोर नाचा, किसने देखा,या म्हणी प्रमाणे तुम्ही कितीही चांगले गुण उधळले तरी पहायलाच कुणी नसेल तर त्यास काय अर्थ आहे. अगदी या म्हणीच्या उलट अर्थाने, कितीही खराब कामे केली तरी पहायला कोण येणार आहे व वरिष्ठ लोकांचा वरदहस्त आहेच, या अर्विभावात राहून दरवर्षी कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार या रेज मध्ये झालेला आहे. रस्त्यावरचा पोलीस पैसे खाताना दिसतो, कार्यालयातला लिपिक, तलाठी, आरटीओ पैसे खाताना दिसतो, पण जंगलातला हा कर्मचारी दिसत नसल्याने अनेक अधिकारी लोकांनाच सोबत संगत करून मस्तवाल झाल्याचे चित्र दिसत आहे.
ठाणे सर्कल वन विभागातील टोकावडे दक्षिण रेंजमध्ये फेब्रुवारी 2019 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन लाखो रूपये खोटी कामे दाखवून काढण्यात आली आहेत. वन मंजुरांमार्फत करावयाची कामांमध्येही मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आहे. खोटे मंजुर दाखवून 30 ते 40 लाखांपर्यंत अपहार झाल्याचा संशय आहे. एका दिवसात जंगलात फिरण्यासाठी 30 ते 40 हजाराचा खर्च डिझेलवर दाखवला आहे. विशेष म्हणजे, हा सर्व गैरव्यवहार वन परिक्षेत्र अधिकारी सुधीर मांजरे यांनी केला आहे, तसेच ते आपल्या अधिकाराचा गैरवापर करून आपल्या सहकारी कर्मचार्यांवर ठपका ठेऊन स्वत: सुटण्याचा प्रयत्न करत आहेत.
वरिष्ठांकडून वाचवण्याचा प्रयत्न
वन परिक्षेत्र अधिकारी सुधीर मांजरे यांच्या विरोधात प्रहार जनशक्ती या पक्षाच्या पदाधिकार्यांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या चौकशा झाल्या. या सर्व चौकशा करणारे वरिष्ठ अधिकारीच मांजरे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची आणखी एक तक्रार झाली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि संपुर्ण यंत्रणा, 2019 ते 2022 पर्यंतचे कॅश बुक याची सखोल चौकशी त्रयस्तामार्फत करावी, अशी मागणी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पुन्हा करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी होताना मांजरे यांच्यावर आधी निलंबनाची कारवाई करावी, कारण ते चौकशीत अडथळे आणण्याचे काम करत असल्याचेही बोलले जात आहे. आता पर्यंत वरिष्ठांनी या भ्रष्ट अधिकार्याला पाठीशी घालण्याचेच नाही तर त्यांना बदली आणि पदोन्नतीसाठी देखील सहकार्य केले आहे.